अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर घेरावा घालणार… सागरबाबा मिसाळ यांचा इशारा
प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
इंदापूर ता. १६ : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून, त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत. कामगारांच्या हक्कासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी रत्नपुरी मळा ते जंक्शन चौकापर्यंत ‘सत्याग्रह पायी मोर्चा’ काढण्यात आला.
तत्कालीन महसूल राज्यमंत्री श्री. रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या शिफारशींनुसार जागेचा ताबा व घर देण्याचे आश्वासन त्यावेळी कामगारांना देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आजतागायत कामगारांना योग्य सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक कामगारांच्या घरांची अवस्था दयनीय झाली असून, काहींची घरे पावसाचे पाणी साचून राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, तर काही घरे ही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
कामगारांची मुख्य मागणी म्हणजे, २ गुंठे जागा आणि घर देण्याचा शासन निर्णय तात्काळ अमलात आणावा, तसेच ९० च्या दशकात कार्यरत असून आजही नोकरीवर असलेल्या कामगारांना ७४७ वा ६४६ असा जागेचा लाभ त्वरित मिळावा. शासनाने दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व श्री. शेखर बयाजी काटे, श्री. सागर दशरथ मिसाळ, आणि श्री. आकाश भाऊ पवार यांनी केले असून, मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे. “आमचे हक्क नाकारले गेले, तर आम्ही अधिक उग्र पध्दतीने आंदोलन छेड्डू,” असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
