स्नेहबंध’ने तिरंगा अभियान राबविल्यामुळे राष्ट्र प्रेमाची उभारी देईल – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया .
प्रतिनिधी -सारंग महाजन.
स्नेहबंध तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्ष कार्यालय तेथे तिरंगा अभियान
अहिल्यानगर – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. ‘स्नेहबंध’ सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या कल्पनेतून राबवलेली “तिरंगा अभियान” राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय येथे घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘स्नेहबंध’ चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, नाशिकचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयुर चरखा, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक जगदीश भांबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, शिक्षिका सीमा चोभे, सुप्रिया खामकर, ईशानी खामकर तसेच छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या पीएमश्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पोलीस अधिक्षक घार्गे म्हणाले, लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या देशप्रेमाची, शहिदांच्या बलिदानाची आठवण आणि शहीद वीरांप्रती कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करत आहोत. मागील तीन वर्षात राज्यात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देशप्रेमाचा सुगंध वाहणार …
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, आपल्या राष्ट्र ध्वजातील रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे.
