नागपूर कुही तालुक्यातील मांढळ गावात पावसाने दुर्दैवी घटना घडली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
राज्यात दोन दिवसांपासून आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील काही भागात पाऊस सुरु झाला असून यासोबत वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशात शेतातून फवारणीचे काम करून दुचाकीने घरी जात असताना वीज कोसळल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील मांढळ शेतशिवारात घडली आहे.
नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळ शेतशिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सुनिता दशरथ मेश्राम (वय ४५) आणि त्यांचा मुलगा धम्मशिल दशरथ मेश्राम (वय २५) असे मृत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. मेश्राम कुटुंबीय दिवसभर शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान शेतात फवारणी करून मोटरसायकलने सुनीता व धम्मशिल मेश्राम हे घरी जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी विज कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.
कुटुंबातील तिघेजण बचावले यावेळी मेश्राम कुटुंबातील आणखी तिघे जण शेतात होते. काम आटोपून आई व मोठा मुलगा लवकर घरी निघाले होते. या अपघातात मोठ्या मुलाचा जीव गेला असून वडील, आजी आणि लहान मुलगा सुखरूप आहेत. दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे जखमींना दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले. कुटुंबियांना शासन स्तरावरून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
