दहीहंडी संस्कृतीची जपणूक : ४ वर्षांची युक्ता नवी पिढीचे प्रेरणास्थान…..
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
नवी मुंबई कोपरखैराणे येथील केवळ ४ वर्ष २८ दिवसांची युक्ता रावी राहुल आहिरे (राहुल शोभा मोहन आहिरे) आज दहीहंडी संस्कृती जपणाऱ्या नव्या पिढीचे प्रेरणास्थान ठरली आहे. वयाच्या फक्त दोन वर्षांपासून घरच्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केलेल्या युक्ताने यंदाच्या दहीहंडी साठी तब्बल गुरुपौर्णिमेपासून रोज नियमित सराव केला आहे.
युक्ताचे प्रथम गुरु म्हणजे तिचे वडील राहुल आहिरे, जे स्वतः मागील २० वर्षांपासून नवी मुंबईतील पहिला रजिस्टर गोविंदा पथक ‘बालगोपाळ मित्र मंडळ, जुईनगर’ मध्ये सर्वात वरच्या थरावर सहभागी होत आहेत. यंदा मंडळाचे २५ वे वर्ष असून, परंपरेत त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
या यशामध्ये युक्ताच्या आई रावी राहूल आहिरे यांचाही मोलाचा वाटा आहे. कारण राहुल आहिरे कामावर असताना, त्या रोज मुलीला प्रोत्साहन देतात आणि कोपरखैराणे ते जुईनगर असा तब्बल १० किमी प्रवास करून सरावासाठी नेतात.
युक्ता सध्या ऑयस्टर इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैराणे येथे ज्युनियर केजी मध्ये शिकत आहे. सकाळी शाळा, त्यानंतर डान्स क्लास आणि मग पथकाचा सराव अशा व्यस्त वेळापत्रकातही ती आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होते.
राहुल आहिरे सांगतात, “ही स्पर्धा नाही, तर आपल्या संस्कृतीचे संवर्धन आहे. लहानपणापासूनच संस्कार रुजले पाहिजेत, म्हणून मी युक्ताला तयार करत आहे.”
खास कौतुक राहुल आणि रावी आहिरे यांचे आपल्या मुलीला जोखीम असलेले पण संस्कृती जपणारे कौशल्य शिकवून मंडळासाठी प्रेमाने देणगी देणारे खरे संस्कृतीरक्षक!
युक्ताची मेहनत, तिच्या आई-वडिलांचे योगदान आणि संस्कार हे नवी पिढीला संस्कृतीशी जोडणारे प्रेरणादायी उदाहरण आहे.
