अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मॉर्निंग वॉक करीत असताना महिला लुटप्रकरणी आरोपी जेरबंद – डेक्कन पोलिसांची यशस्वी कारवाई
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे,
लॉ कॉलेज रोडवरील मंजुरंजन बिल्डिंगजवळ एका ६१ वर्षीय महिलेला मॉर्निंग वॉकवरून घरी जात असताना धक्का देऊन खाली पाडत तिच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली होती. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु.र.नं. १३१/२०२५ भा.दं.वि. कलम ३०४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समांतर तपास करून आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. यानुसार युनिट-१ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. फौ. मखरे, स.पो. फौ. शिंदे, साळुंखे, भोसले, लडकत, जमदाडे, पेरणे व साबळे या पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला.
फुटेजच्या आधारे तपास करत असताना पोलीस अंमलदार मयुर भोसले व अमित जमदाडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीशी मिळता-जुळता इसम दिप बंगला चौक, शिवाजीनगर येथे राहतो. अधिक तपासाअंती आरोपीचे नाव राजू वामन खुडे (वय ४० वर्ष, रा. प्रमोद महाले नगर, दिप बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले.
इशान हॉटेलजवळ त्याला अटक करून विश्वासात घेतल्यानंतर, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, स.पो. फौ. राहुल मखरे, स.पो. फौ. विनोद शिंदे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अभिनव लडकत, शुभम देसाई व निलेश साबळे यांचा समावेश होता.
