अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात इंग्रजी साहित्य मंडळ’ चे उद्घाटन
रावेर तालुका प्रतिनिधी सानिया तडवी
रावेर: श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात नुकतेच ‘इंग्रजी साहित्य मंडळ’ (English Literary Association) चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. वाङमय अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कविता अंबादास महाजन व उपाध्यक्ष गायत्री जीवन महाजन यांची निवड करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील साहित्याची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या लेखन व संभाषण कौशल्याला वाव देणे हा मुख्य उद्देश आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे होते. तसेच, महाविद्यालयात उपप्राचार्य डॉ संदीप धापसे, IQAC समन्वयक डॉ बी .जी. मुख्यदल, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.नीता जाधव, डॉ. मनोहर तायडे ,प्रा. वैभव जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीता जाधव यांनी मंडळाच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि ‘साहित्य हे समाजाचा आरसा आहे’ असे प्रतिपादन केले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हे मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम, जसे की, कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन, पुस्तक परीक्षण आणि साहित्यिक चर्चासत्र आयोजित केले जातील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षातील कोमल चौधरी, सैनाज तडवी, याने केले, तर आभार प्रदर्शन दुर्गा वानखेडे हिने केले. याप्रसंगी विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
