छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न.
“न्याय आपल्या दारी, समाधान आपल्या हाती” या संकल्पनेतून महिलांना दिलासा
यावल दि.२९ ( सुरेश पाटील )
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम यावल तालुक्यातील कोसगाव येथे आज मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
हा विशेष कार्यक्रम आमदार मा. अमोल हरीभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना,सुविधा आणि त्यांच्या हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महिलांना दाखले,योजनांचे मार्गदर्शन,नोंदणी,आधार,जात प्रमाणपत्र,पेंशन योजना आदी सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या.
या उपक्रमामुळे अनेक महिलांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी दीपक गवई यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी करून सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाला पंचायत समिती अधिकारी,कृषी खात्यातील अधिकारी,कर्मचारी,शिक्षण विभागातील अधिकारी,कर्मचारी , आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी,भागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व सर्व ग्रामसेवक व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
