अनुकंपाधारक उमेदवारांनी अनुकंपा प्रतिक्षासुचीबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
▪️३० सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
नागपूर दि २३ जुलै :- प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करून सर्वसामान्यांचे शासन स्तरावरील प्रश्न कालमर्यादेत मार्गी लागावेत यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कालबध्द कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून याबाबत शासनाने सुधारित धोरण जाहीर केले आहे. याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन भवन येथे आज जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची विशेष बैठक बोलावून त्यात प्रशिक्षण देण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दिनांक १७ जुलै रोजी अनुकंपा नियुक्तीबाबत सर्वसमावेशक सुधारीत धोरणाबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार टप्पा-१ अंतर्गत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रतिक्षासुची अद्ययावत करणे- उमेदवारांचे नाव बदलणे तसेच प्रक्रियेतील अर्जासंदर्भात कार्यवही करून प्रतिक्षासुची अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिक्षासुचीवरील उमदेवाराचा मृत्यु झाल्यास, रिट याचिका क्र. ३७०१/२०२२ मधील मा. उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक २५/०८/२०२४० नंतर प्रतिक्षासुचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पुर्ण झाल्याने वगळल्यास, प्रतिक्षासुचीवरील उमेदवाराऐवजी कुटुंबातील अन्य सदस्याचे नाव समाविष्ट करावयाचे असल्यास अथवा उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांनी वरीलप्रमाणे नाव अनुकंपा प्रतिक्षासुचीत बदल / समाविष्ट करावयाचे असल्यास त्यांनी त्यांचे संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी केले.
