अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खेड तालुक्यातील आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र श्रद्धास्थान असून, शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून येथे मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली असली तरी अद्याप काही महत्वाची कामे रखडलेली आहेत. याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत आवाज उठवला.
सिद्धबेट परिसर, जिथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वास्तव्य केले, त्या भागाचा उर्वरित विकास शासनाने तातडीने हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच चऱ्होली रिंगरोडचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. चाकण-आळंदी, चिंबळी फाटा-आळंदी आणि आळंदी- मरकळ हे रस्ते चार पदरी काँक्रीट स्वरूपात विकसित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
महाद्वार ते शनी मंदिर घाटापर्यंत दगडी पायऱ्यांचे काम तातडीने व्हावे, तसेच आळंदी नगरपरिषदेच्या २५-३० कोटींच्या प्रशासकीय इमारतीसाठी नगरविकास विभागामार्फत निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार काळे यांनी मांडली. भाविकांसाठी उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला दहा कोटींचा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आणि उर्वरित निधीही त्वरीत उपलब्ध करावा, अशी विनंती केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५०व्या माऊली जयंतीनिमित्त इंद्रायणी शुद्धीकरण आणि प्रदूषणमुक्तीचे आश्वासन दिले आहे, याची आठवण करून देत आमदार काळे यांनी त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
आळंदी परिसरात वाढलेली अवैध धंद्यांची प्रकरणे आणि त्यामुळे वारकरी व भाविकांना निर्माण होणाऱ्या त्रासांविरोधात मुख्यमंत्री यांनी पोलिस यंत्रणेला कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत केली. तसेच, वारकरी शिक्षण संस्थांमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाईसह अशा संस्थांची चौकशी करून गरज असल्यास बंद करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
याशिवाय आळंदीच्या रस्त्यांची रुंदी व वाहतूक नियोजन, ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती, भाविकांच्या वाहनांवर अन्यायकारक दंड आकारणी टाळण्याची मागणीही त्यांनी केली.
पालखी मार्ग विकासासंदर्भातही त्यांनी आवाज उठवत ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे वाखरी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती आणि निधीसाठी विशेष मागणी केली.
“वारकरी संप्रदाय, आळंदी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत,” अशी ठाम मागणी करत आमदार बाबाजी काळे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
