यावल तालुक्यात खळबळ मनुदेवी फाट्यावरील हॉटेल रायबां मालकावर गोळीबार मधील घटना
यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)
यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर गुरुवारी (दि.१० जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास रायबा हॉटेलमध्ये चाळीस वर्षीय हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय 40) यांच्या छातीत आणि हातावर गोळ्या झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर तातडीने त्यांना जळगाव शहरातील रिंग रोडवरील खाजगी आरोशी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री काही अज्ञात व्यक्ती हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात प्रमोद बाविस्कर यांच्यासोबत वाद झाल्यानंतर थेट गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस हवालदार वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, मुकेश पाटील, किशोर परदेशी यांच्यासह पोलीस पथक रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली असून घटनास्थळी निकामे काडतूस मिळाले आहेत तसेच आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली असून हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
