पिस्टल विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक. तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतूसे जप्त
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
पुणे : आज दिनांक 9जुलै 2025 रोजी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एक सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने पकडले असून त्याच्याकडून तीन गावठी बनावटीची पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा सुमारे ७६ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात होऊ शकणारा गंभीर गुन्हा टळल्याचे मानले जात आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (रा. संतोषनगर, आंबेगाव) असे आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मोक्का यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो पुणे शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यावर सतत पोलिसांची नजर होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार तेलंगे पाटील यांना माहिती मिळाली की, ठोंबरे हा पिस्टल विक्रीसाठी मुंबई-बंगळुरू महामार्गालगत वडगाव भागात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वडगाव येथे सोमवारी पहाटे सापळा रचला. काही वेळाने ठोंबरे हा तेथे पोहचताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील ढोलक बॅगेतून तीन गावठी बनावटीची लोखंडी पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि इतर साहित्यासह एकूण ७६ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. ही शस्त्रे तो विक्रीसाठी घेऊन आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे पाटील, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.
