एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विधीमंडळाच्या वतीने महाराष्ट्राच्या सुपूत्राचा सन्मान

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी- सरन्यायाधीश भूषण गवई

प्रतिनिधी सतीश कडू

विधीमंडळाच्या वतीने महाराष्ट्राच्या सुपूत्राचा सन्मान

मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. ८: भारत सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असून भारताच्या राज्यघटनेलाही तितकेच महत्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणताही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश तथा महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई यांनी केले.

विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश श्री. गवई बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.

राज्यघटनेचा इतिहास सांगून सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले की, एक देश आणि सर्वसमावेशक एकाच राज्यघटनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेतली. यामुळेच जात, पात, धर्म बाजूला ठेवून न्यायदानात आणि सर्व बाबतीत देश एकसंध राहण्यास मदत मिळाली आहे. देशाने राज्यघटनेचा अमृत महोत्सवी कार्यकाल पूर्ण केला आहे. गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाने राज्यघटनेला अभिप्रेत काम केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समान न्याय राज्यघटनेमुळेच सर्वांना मिळाला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा सभापती या देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राज्यघटनेच्या समानतेमुळेच पोहोचल्या. आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती या घटकातील नागरिकांनाही राज्यघटनेमुळे उच्च पदावर विराजमान होता आल्याचे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी सांगितले. गेल्या २२ वर्षात उपेक्षित, वंचित, सोशित, पिडीत समाजासाठी समान न्याय देण्याचे काम पार पाडता आल्याने त्यांनी राज्यघटनेचे आभार मानले.

*मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

महाराष्ट्राचे सुपूत्र भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राचा मराठी माणूस भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याने राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण आहे. राज्यात न्यायाधीश असताना त्यांनी विविध महत्वाच्या संदर्भात व्यापक जनहित पाहून न्यायदानाचे काम करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नागपूरमधील झोपडपट्टी तोडून टाकण्याचा निर्णय झाला, त्यावेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावून त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. अतिशय सामान्य माणूस असा असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी दाखवून दिले आहे. आमदार निवासात राहायला असताना ते जनतेच्या राहण्याची व्यवस्था करून स्वत: व्हरांड्यात बसून अभ्यास करीत. मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही.

टायगर कॉरिडॉरच्यावेळी रस्त्याची अनेक कामे अडलेली होती, मात्र सरन्यायाधीश श्री.गवई यांनी यावर समिती नेमून मानवतेचा दृष्टिकोन, व्यापक जनहित समोर ठेवून न्यायदान केले. यामुळे अडलेली कामे पूर्ण होऊ शकली, अशी त्यांच्याबद्दलची आठवण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितली. सरन्यायाधीश श्री. गवई हे समन्वय आणि चर्चेतून प्रत्येक विषयावर मार्ग काढतात. सर्वांसाठी समान न्याय करतात. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या हातून चांगले न्यायदानाचे काम होऊन त्याची इतिहासात दखल घेतली जाईल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

*न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेले सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपूत्रच नाहीत तर महाराष्ट्राचे भूषण देशाच्या न्यायप्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत. त्यांच्या अनेक निर्णयांमधून मानवता, संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले. सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी न्याय, हक्क मिळवून दिला. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी माणुसकीचे तत्व कायम जपले. केवळ न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, एक आदर्श नागरिक, कठोर परिश्रमी विद्यार्थी, आणि एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. न्यायदान करताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले असून त्यांची भाषा सौम्य असली तरी निर्णय ठाम असतात आणि म्हणून त्यांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे, असेही ते म्हणाले.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराला दोन बाजू आहेत. एका बाजूला लोकशाहीचा एका स्तंभाने, लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाचे सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तींचा हा सत्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सभागृहांच्या जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहांतील आपल्या माणसांकडून, कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने, कौतुकाने केलेला हा गौरव आहे.

*सरन्यायाधीशांचा सत्कार म्हणजे एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभाचा केलेला गौरव- उपमुख्यमंत्री अजित पवार*

विधीमंडळात अनेकांचे सत्कार झाले, मात्र सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या सत्काराची इतिहासात नोंद होईल. कारण हा सत्कार एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभाचा केलेला गौरव असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

देशाच्या सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन राज्यघटनेचे महत्व, विविध पैलू समजावून सांगणे, ही घटना विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाणारी आहे. लोकशाहीला देखील अधिक बळकटी देणारी आहे. देशातल्या 130 कोटी लोकसंख्येच्या आशाआकांक्षा कायदेमंडळातून, देशाच्या संसदेवर, राज्याच्या विधिमंडळावर, न्यायमंडळ म्हणून न्यायालयावर अवलंबून असतात. या सर्व संस्थांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे, स्वतंत्रपणे पार पाडणे अपेक्षित आहे.

लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. पत्रकारिता हा अधिकृत नसला तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो. लोकशाहीची व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी, टिकवण्यासाठी मजबूत राहण्यासाठी या सर्व संस्थांनी परस्परांचा मान, सन्मान, आदर ठेवून आपापल्या अधिकाराच्या मर्यादेत स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित आहे. यातूनच आपली लोकशाही बळकट होणार आहे. न्याय प्रक्रियेमध्ये विकेंद्रीकरण व्हावे, ही सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका देशातल्या गावखेड्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देणारी आहे, हा महाराष्ट्राचा गौरव वाढविणारा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

 

शोषित, वंचितांसाठी कळवळा असणारे सरन्यायाधीश – सभापती प्रा.राम शिंदे

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सभागृहात होत असलेला सत्कार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. अभ्यासू वृत्ती, चिकित्सक स्वभाव, धाडसी आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारे आणि शोषि, वंचितांसाठी कळवळा असणारे सरन्यायाधीश असल्याचे प्रतिपादन सभापती प्रा.राम शिंदे यांनी प्रास्ताविकपर भाषणात केले.

न्यायाधीशांनी समाजाशी एकरूप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य पद्धतीने न्यायदान होईल. भारताच्या राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, बेसिक स्ट्रक्चर, फंडामेंटल राईट्स यांना प्राधान्य देऊन समता आणि न्याय याची प्राप्ती करणारी शक्ती असणारी न्यायाधीशांची महत्त्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते श्री. दानवे म्हणाले की, मराठी माणूस सरन्यायाधीशपदी विराजमान झाला याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. सरन्यायाधीश हे पद नाही, संविधानाच्या संरक्षणकर्त्याची भूमिका त्यांनी घ्यावी. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, परिवर्तनशील दिशा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सूत्रसंचालन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले तर आभार अध्यक्ष अड राहुल नार्वेकर यांनी मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link