धागा धागा अखंड विणूया मंदार केसकर पंढरपूर
प्रतिनिधी सारंग महाजन
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरूया
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया
गेली अठ्ठावीस युगं भक्तीची “वीण” गुंफून कमरेवर हात ठेवून नित्य स्मरणात असलेल्या भक्तांच्या दर्शनाची ओढ असणाऱ्या आणि भक्तांना ओढ लावलेल्या भगवान विठ्ठलाची बिगर आमंत्रणाची “पंढरीची वारी” आज आमच्या पंढरपुरात सुरू आहे. आज सर्व संतांच्या पालख्यांच्या आगमनाने लाखोंच्या संख्येने गजबजून गेलेल्या पंढरपुराची व्याख्या…
थोर संत जनाबाईंनी संत भार पंढरीत.. कीर्तनाचा गजर होत
ऐशा संता शरण जावे.. जनी म्हणे त्याला ध्यावे
या अभंगात शेकडो वर्षांपूर्वीच केली आहे. मुळातच “पंढरपूर-विठ्ठल-संत-वारी-वारकरी” या पंचसुत्रीवर… संतसाहित्याबरोबरच आजपर्यंत अनेक चोपड्या भरून लेखन आहे ते वाचायला-अनुभवायला सात जन्म अपुरे आहेत.
मागच्या पिढीकडून जे चांगल्या विचारांचे हस्तांतरण व त्याची जिवापलीकडे केली जाणारी जपणूक हीच वारीची शिकवण आहे म्हणून आज शेकडो वर्षे झाली तरी चांगल्या विचारांचे ऊर्जास्रोत असणारी ही वारी आजपर्यत अशीच हस्तांतरीत होऊन आपल्यापर्यंत आली आहे आणि अशीच हजारो वर्षे पुढेही होईल. आजही पंढपुरातच नव्हे नियमाच्या वारकऱ्यांच्या अनेक घरात जीर्ण झालेल्या पोथ्या रोजच्या पूजेत दिसतील…नवीन पोथ्या पारायणात दिसतील. नवं वापरलं तरी …जुनं अडगळीत न टाकता जुनं पूजेत ठेवा ही वारकरी सांप्रदायाची शिकवण आपल्याला दिसते. हे सांगणारा मी कोणी अभ्यासू, विद्वान नाही.. नियमाचा वारकरीही नाही… फक्त एक साधा गावकरी आहे. “जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले…” या संतवचनाप्रमाणे पंढरपुरात जन्मलो, वाढलो, राहतोय याचा अभिमान आहे.
आज जन्मापासून वारी बघतोय, अनुभवतोय… प्रत्येक वारीत नवीन काहीतरी गवसतंय… प्रत्येक वेळी शब्दांत मांडणं शक्य होत नाही.
अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे
विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे
या “पी. सावळारामांच्या” भावगीताप्रमाणे…. भूगोलातील अक्षांश-रेखांशाच्या” मर्यादेपालिकडे जगभरात वारी पसरली बदलली, हाय टेक झाली म्हणा, काहींनी तिचा इव्हेंट केला म्हणा… पण जोपर्यंत वडील-मुलाला, आजोबा-नातवाला पाठकुळी घेऊन फिरणारी अनेक दृश्य मी प्रत्येक वारीत बघत आलोय… हे दृश्य जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे दोहोंच्या वयातील फरकाने वारी पुढील पिढीपर्यंत संक्रमित होणार आहे… हा माझा बाळबोध कयास
समतेच्या-बंधुत्वाच्या आधारावर टिकून असणारी श्री विठ्ठलाची वारी परंपरा… यासाठी संतवचनातील अनेक दाखले देता येतील पण आपल्या चालू शतकातील गीतकार पी. सावळारामांच्या”
बंधुत्वाचा फिरवित चरखा… एकत्वाचे सूत्र धरूया
धागा धागा अखंड विणूया…विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया
—- या सार्थ ओळींपाशी माझी… “वारी कधीपासून..? अन कुठपर्यंत…?” ही प्रश्नांची मालिका विलीन होते
राम कृष्ण हरी
बोला पुंडलिकवरदे हरी विठ्ठल … श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज यांनी की जय
मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
9422380146
