नेकनूर पोलीसाचा अजब कारभार घटना घडुन दहा दिवस झाले तरी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला देखील गोसावी साहेबांनी दाखवली केराची टोपली
(चौसाळा प्रतिनिधी ) विवेक कुचेकर
बीड तालुक्यातील चौसाळा येथे चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालावर दरोडे टाकायला सुरुवात केली असली तरी गुन्हा नोंद करून घेणं नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना जीवावर येऊ लागला आहे. सयाजी शिंदे यांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळ्यात सात एकर डाळिंब बागेतील 22 टन फळ चोरून नेली. 22 ते 23 लाखाचा हा दरोडा पडून देखील चोरांना अभयदान देण्याचं काम केलं जात आहे.
या प्रकरणात दहा दिवस उलटूनही अद्याप गुन्हा नोंद करून घेण्याची गोसावींना गरज वाटली नाही. मग्रुरी इतकी की एस पीं च्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा बायपास वर किरकोळ वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी या घटनांची दखल पोलिसांनी घेतली नाही. गुन्हा नोंद केला गेला तर नाहीच नाही उलट तक्रार द्यायला आलेल्या लोकांनाच भीती घालण्याचं काम केलं गेलं. “चोरांना मेसाई धार्जीन”अशी म्हण प्रचलित आहे. याचाच अपभ्रंश करून चोरांना “नेकनुर पोलीस धार्जीन” असं म्हटलं जाऊ लागला आहे. चोराना नेकनुर पोलीसाचा आश्रय मिळालेलाच आहे. पण आता शेतकऱ्यांच्या शेतमालावर देखील दरोडा पडू लागला आहे. असं म्हणतात की माकडं लाकडं गोळा करून शेकोटी करतात. या शेकोटीला जाळ नसतो. पण ही लाकडं जळणाला जर वापरली तर ती लाकडं जळत नाहीत. न पेटलेल्या लाकडातली उष्णता शेकोटी भोवती बसलेली माकड शोषून घेतात. त्यामुळे “माकडांची लाकडं चुलीला साकडं“अशी म्हण देखील प्रचलित आहे. अशीच काहीशी स्थिती नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींनी करून ठेवली आहे. कायद्यातली ऊर्जा ताकत त्यांनी शोषून घेतली. परिणामी जनतेला नेकनूर पोलिसांचं साकडे पडू लागला आहे. हे सांगण्याला कारणही तसंच आहे. चौसाळा बायपास वर सयाजी शिंदे यांची सात एकर डाळिंबाची बाग आहे. उन्हाळ्यात तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग सांभाळला, टॅंकरने पाणी आणून झाड जोपासली. उन्हाळ्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी क्रॉप कव्हर टाकण्यात आले. यावर्षी विक्रमी उत्पादन काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. डाळिंबाचं पिक जोमान आलं. बागेतली फळ खरेदी करण्यासाठी व्यापारी चकरा मारू लागले. एवढ्यात चोरट्यांची नजर बागेवर पडली. रात्रीत बागेतली सगळी फळ चोरांनी तोडून नेली. 22 टनाहून अधिकचे डाळिंब फळ चोरून नेले. वीस ते पंचवीस लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
सकाळी ही बाब लक्षात येताच चौसाळा पोलीस चौकीला फिर्याद देण्यासाठी शिंदेंनी धाव घेतली. पोलिसांनी लेखी तक्रार स्वतःकडे ठेवून घेतली. ठाणे प्रमुख गोसावी रजेवर आहेत दोन दिवसानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण गुन्हा नोंद झालाच नाही. शिंदेंनी नेकनूरच्या चकरा देखील मारल्या. एक दोन टन माल चोरीला गेल्याची तक्रार द्या. एवढी मोठी चोरी झाल्याची तक्रार घेता येत नाही असं स्पष्ट गोसावींनी सांगितलं. तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून शेवटी सयाजी शिंदे या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेतली. एसपी समोर त्यांनी कैफियत मांडली. एस पींनी याची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करून घेण्यात यावा असा आदेश चंद्रकांत गोसावींना दिला. पण एसपींच्या आदेश मानतील ते गोसावी कसले? हम करे सो कायदा असं म्हणत एसपींच्या आदेशाला देखील त्यांनी सवयीप्रमाणे केराची टोपली दाखवली. या प्रकरणात नऊ दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप गुन्हा नोंद झालाच नाही. चंद्रकांत गोसावींच्या चोरांना अभय देण्याच्या मानसिकतेमुळे त्यांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाटमारी करणाऱ्या चोरांना गोसावी कुठपर्यंत अभयदान देणार? एसपींच्या आदेशाला असंच आणखी किती वेळा केराची टोपली दाखविणार?या प्रकरणात पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे सयाजी शिंदे हे शेतकरी पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे आता तक्रार करणार आहेत. एस पी नवनीत कावत यांच्या कारकिर्दीलाच काळीमा फासण्याचा काम गोसावी सारखी मंडळी करू लागली आहे .शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कारकिर्दीत तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.
