प्रतिनिधी – किशोर रामाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
नेमिनाथ निर्वाण दिन : गिरनार शिखरावर तणाव, भक्तांना शांततेचे आवाहन
जुनागढ, गुजरात – दिनांक २९ जून
गिरनार पर्वतावरील पाचवे शिखर हे श्री दत्त परंपरेतील एक अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे भगवान श्री दत्तात्रेयांनी १२,००० वर्षांची तपश्चर्या केली व येथेच देहत्याग केल्याची श्रद्धा आहे. या ठिकाणी त्यांच्या पादुकांची पूजा अनेक शतकांपासून सुरू आहे.
यच शिखरावर दिगंबर जैन समाज श्री नेमिनाथजींच्या निर्वाण स्थळाचा दावा करत आहे. दरवर्षी ते निर्वाण दिनाच्या निमित्ताने येथे येतात. यंदा २ जुलै २०२५ रोजी त्यांच्या आगमनाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर काही साधूंनी मोठ्या संख्येने भक्तांना शिखरावर येण्याचे आवाहन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरातील दत्तभक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परंतु गुरु दत्तात्रेय संस्थेने तसेच दत्तभक्तांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही प्रशासनाला सहकार्य करू व कोणताही अनुचित प्रकार होऊ देणार नाही,” असे निवेदन त्यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
या प्रकरणात कोणतीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही यासाठी सर्व पक्षांनी संयम ठेवणे आवश्यक आहे.
