अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
न्हावी :-26/06/2025राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. आम्रपाली मोहिते/सप्तरंगी आई यांच्या हस्ते 50 मुलांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सूर्यकिरणांनी न्हालेल्या सकाळच्या त्या शुभक्षणी,न्हावी शाळेच्या प्रांगणात शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांनी भारलेली हवा दरवळली होती.शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत, समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा ध्यास आजही तितक्याच तेजाने झळकत आहे.त्यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम समाजातील समतेचा,न्यायाचा आणि शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्याचा संदेश घेऊन आला होता.
डॉ.आम्रपाली मोहिते या समाजातील दुर्बल घटकांसाठी नेहमीच कार्यरत राहिल्या आहेत. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर समाधान उमटले.ही केवळ वस्तूंची वाटणी नव्हती, तर शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची खरी जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रोवण्याचा प्रयत्न होता.
डॉ.आम्रपाली मोहिते यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचा उल्लेख करत, “शिक्षण हेच खरे समतेचे शस्त्र आहे,”असे सांगितले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांच्या मनात नवचैतन्याची ज्योत पेटली.
शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या,पेन,पेन्सिल, कंपास यांसारखे शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य शालेय गरजांची पूर्तता नव्हे,तर त्यांच्या स्वप्नांना बळ देणारे पंख होते. उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल सोनवणे यांनी डॉ.आम्रपाली मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले.
शाहू महाराजांच्या “सर्वांना समान संधी” या तत्त्वाची आठवण करून देत,हा कार्यक्रम सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरला. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, डॉ.आम्रपाली मोहिते यांच्या उपक्रमामुळे न्हावी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवा आशेचा किरण फुलला.
यावेळी डॉ.आम्रपाली मोहिते,शितल सोनवणे,अनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नंदू सोनवणे,भानुदास चव्हाण,नवनाथ सोनवणे,किशोर सोनवणे,अनिकेत भोसले,शरद सोनवणे,गणेश कोंडे, रजनीकांत सोनवणे अविनाश भोसले,अमोल शिवणकर,अभिषेक भोसले,मच्छिंद्र गव्हाणे,सोनाली सोनवणे,सोनाली बोन्द्रे,उर्मिला भुतकर,गीतांजली पाटील आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप मोरे यांनी केले, सूत्रसंचालन अनिल चाचर यांनी केले तर आभार रुपाली पिसाळ यांनी मानले.
