बीड जिल्हयातील शेतकऱ्याला लुटणारी पारगाव हायवेवरील सोनसाखळी चोरी उघडकीस
वाशी पोलिसांचा आठ तासांत तपास, दोन आरोपी अटकेत
(वाशी प्रतिनिधी) विवेक कूचेकर
पारगाव (ता. वाशी) हायवेवर झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाशी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत तपास पूर्ण करून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत सुमारे २.८० लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे.
ही घटना २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी दीपक भारत यादव (वय. ३५, व्यवसाय – शेती, रा. धनकवडी, ता. धारूर, जि. बीड) हे आपल्या दोन मित्रांसह तुळजापूर-येरमाळा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून बीडकडे परतताना, पारगाव टोलनाका ओलांडल्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर लघुशंकेसाठी थांबले असता, दोन अनोळखी इसमांनी “दादा, कुठले आहात?” असे विचारत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २०८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत २१ जून रोजी पहाटे १:१६ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पो.हे.कॉ. १५२९ आर.बी. लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (धाराशिव), अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड (भूम चार्ज) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.आर. थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. सावंत, परि. पो.नि. ए.वी. भाळे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला.
गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने व आरसीपी प्लाटूनच्या मदतीने वाशी पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये नवनाथ ऊर्फ बाळू कल्याण पवार व निमा छन्नू पवार, (दोघे रा. लोनखस पारधी पिढी, ता. वाशी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत ₹२.८० लाख) जप्त केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
पोलीस पथक:
पो.हे.कॉ. लाटे (१५२९), यादव (१५१६), पो.ना. औताडे (१५९८), पो.कॉ. सय्यद (१७०२), मलंगनेर (१७८१), साठे (४२८), गिराम (२६४), नरवडे (३५९), पवार (१६१६) यांचा तपासात सक्रिय सहभाग होता.
