प्रतिनिधी: किरण सोनवणे
चाकण – घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना चाकण – शिक्रापूर रस्त्यावर बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील पानसरेवस्ती येथे शुक्रवारी (दि. ६ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा. पानसरेवस्ती, बहुळ) असे असून, आरोपीचे नाव दशरथ गुलाब पानसरे (रा. बहुळ) आहे. तसेच, या घटनेत दत्तात्रय यांचे चिरंजीव तुकाराम दत्तात्रय पानसरे हे गंभीर जखमी असून सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
घटनेचे सविस्तर वर्णन :
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून दशरथ पानसरे याने आपल्या चुलत भावावर, तुकाराम पानसरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तुकाराम यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार पाहून तुकाराम यांचे वडील दत्तात्रय पानसरे यांनी हस्तक्षेप करत “का मारतोस?” अशी विचारणा केली असता, आरोपीने थेट त्यांच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून त्यांचा जागीच खून केला.
पोलिसांचा तपास सुरू :
या प्रकरणी तुकाराम पानसरे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
ही घटना गावात खळबळ उडवणारी ठरली असून, घरगुती वादाचे असे टोकाचे रूप धारण करणे, हे समाजासाठी धोक्याचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
