संपादकीय पुणे – पीएमपी बसस्थानकांवरील महिला व मुलींची छेडछाड, चोरी, आणि अश्लील वर्तन करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसस्थानकांवर प्रवासी सुरक्षेसाठी विशेष पोलिस पथकाची तैनाती करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली २६ जणांच्या पोलिस फौजफाट्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात पीएमपीमार्फत दररोज ३८१ मार्गांवर २० हजार फेऱ्या घेतल्या जातात. यातून रोज सुमारे १० लाख नागरिक प्रवास करतात. मात्र, प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची चोरी, महिला प्रवाशांवरील अश्लील हावभाव, छेडछाड तसेच बीआरटी स्थानकांवर असभ्य मजकूराचे लिखाण अशा घटना सतत वाढताना दिसत आहेत.
या घटनांमुळे विशेषतः महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. प्रवाशांकडून वारंवार आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पीएमपी अध्यक्षांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन, प्रमुख बस स्थानकांवर आणि गर्दीच्या मार्गांवर सकाळी व रात्री गस्त वाढवण्याची विनंती केली होती.
पोलीस पथकाचे तपशील :
पोलीस निरीक्षक : २
सहाय्यक पोलीस निरीक्षक : १
पोलीस उपनिरीक्षक : १
पोलीस कर्मचारी : २२
या फौजफाट्याच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत छेडछाड, चोरी आणि असामाजिक वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांचा करडी नजर असणार आहे. अशा कठोर उपाययोजनांमुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित व विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.
