जनजागृती रॅली, दुरुस्ती कामे आणि नागरिकांमध्ये वीज सुरक्षेची जागरूकता
नसरापूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा (महावितरण) २० वा वर्धापन दिन दिनांक ५ जून २०२५ रोजी साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नसरापूर उपविभागामार्फत ‘वीज सुरक्षा सप्ताह’ विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली गेली.
सप्ताहभर विविध देखभाल व दुरुस्ती कामे
या सप्ताहात नसरापूर उपविभागातील सर्व शाखांमध्ये लघुदाब विद्युत वाहिन्यांची तपासणी, गंजलेले पोल्स व नादुरुस्त उपकरणांचे पुनर्बदल, तसेच वितरण पेट्यांची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
नागरिकांना मार्गदर्शन – सुरक्षिततेच्या टिप्स
नागरिकांना त्यांच्या घरांतील वीज उपकरणे योग्य व सुरक्षित पद्धतीने कशी वापरावीत, याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. योग्य दर्जाची केबल्स, फ्यूज आणि RCCB (Residual Current Circuit Breaker) वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आर्थिंगची गरज आणि पावसाळ्यातील काळजी या विषयांवरही चर्चा झाली.
वीज चोरीपासून दूर रहा – कायदाही आणि जीवही धोक्यात
या वेळी उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटोळे यांनी वीज चोरीचे गंभीर परिणाम नागरिकांपुढे मांडले. वीज चोरीमुळे केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे तर जीवितहानीची शक्यताही अधिक असते. कोणतीही अडचण आल्यास थेट महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
जनावरांचे पोलखाली बांधणे टाळा
घाटोळे साहेबांनी पोलखाली जनावरे बांधण्याची प्रथा बंद करावी असे सांगितले. विशेषतः पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांचे झाडांवरून तुटून खाली पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा प्रसंगी तत्काळ महावितरणशी संपर्क साधावा.
वीज सुरक्षा रॅली – सामाजिक भान जागवणारा उपक्रम
नसरापूर महावितरण कार्यालयापासून चेलाडीपर्यंत वीज सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रमुख उपस्थितींमध्ये उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटोळे, सहाय्यक अभियंता श्री. योगेश कारळे, कनिष्ठ अभियंते श्री. अभिजीत भोसले व इतर तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात सहभागी कर्मचारी
कार्यक्रमामध्ये श्री. राजकुमार कदम, श्री. योगेश फिसके, श्री. समीर मुजावर, श्री. संजय गोरड यांच्यासह अनेक तांत्रिक व बाह्यस्रोत कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या कार्यामुळे उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
महावितरणचा सामाजिक संदेश
या उपक्रमाच्या माध्यमातून महावितरणने एक सामाजिक बांधिलकी जपत वीज सुरक्षेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील आणि नागरिकांनी त्यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
