अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जावळे बिल्डिंगमध्ये वायर स्पार्किंगची घटना फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
प्रतिनिधी : किशोर रमाकांत गुडेकर
मुंबई (दादर ) २६ एप्रिल संध्याकाळच्या सुमारास जावळे बिल्डिंगमधील मीटर रूममध्ये वायरिंगमध्ये स्पार्क होत असल्याची घटना घडली. मीटर रूममधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच प्रवीण नरे, मयूर धुरी आणि ऍड. योगिता सावंत यांनी तत्काळ फायर ब्रिगेडला कॉल करून पाचारण केले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
रहिवाशांच्या मदतीने आणि फायर ब्रिगेडच्या वेळीच हस्तक्षेपाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. फायर ब्रिगेडच्या जलद प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा मोठा धोका टळला.
दरम्यान, बेस्ट विभागाला देखील घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रतिसादात झालेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गेली चार वर्षे रहिवासी ओव्हरहेड वायर जमिनीखाली नेण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. परंतु अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
रहिवाशांनी बेस्ट प्रशासनाकडून त्वरीत योग्य पावले उचलण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
