प्रतिनिधी : श्रीहरी आंभोरे पाटील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर जवळ महू या ठिकाणी झाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस एक प्रमुख भारतीय सण उत्सव आहे हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात 102 देशापेक्षा जास्त देशात साजरा केला जातो हा सण सामाजिक ,सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा आहे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते या दिनाला आंबेडकरवादी चळवळतील लोक ‘समता दिन’ तर महाराष्ट्र शासन ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा करत असतात. या दिनी त्यांचे अनुयायी शासकीय- प्रशासकीय कर्मचारी ,विविध राजकीय पदाधिकारी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी, दीक्षाभूमी ,दिल्ली येथील महानिर्वाण ठिकाण ,चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे ,सार्वजनिक ठिकाणी शहरे ,गावे ,शाळा महाविद्यालय विद्यापीठे ,भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहार या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध चित्रकला स्पर्धा ,सामान्य ज्ञान स्पर्धा ,प्रश्न – उत्तर स्पर्धा, चर्चासत्रे, नृत्यकला, निबंध स्पर्धा ,परिसंवाद चर्चा ,18 तास अभ्यास, विविध खेळांच्या स्पर्धा आणि नाटके असे कार्यक्रम आयोजित केल्या जातात. याचबरोबर 14 एप्रिल ते 14 मे असा एक महिना संपूर्ण ग्रामीण व शहरी भागामध्ये जयंती ही शोभायात्रा ,रॅली ,वाजत गाजत घोषणामय वातावरणात साजरी केल्या जाते . या महामानवाची जयंती संयुक्त राष्ट्र संघाने 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक भारतीय व्यक्ती म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केलेली आहे .यांच्याशिवाय मार्टिन ल्युथर किंग व नेल्सन मंडेला या दोन व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने बाबासाहेब यांना ‘ विश्वासाचा प्रणेता’ म्हणून संबोधले आहे.
रामजी आंबेडकर व भीमा बाईच्या पोटी जन्माला आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चौदावे आपत्य आणि योगायोग 14 एप्रिल या दिवशी त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना भीम ,भिवा व भीमराव या नावाने ओळखले जाई. भीमराव वयाचे पाच वर्ष पूर्ण केल्यावर इ. स. 1896 मध्ये नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्पस स्कूल या मराठी शाळेत नाव दाखल करण्यात आले याच काळात आईचे छत्र हरवले आणि पुढील सांभाळ मीराबाई नावाच्या त्याने केला सातारा हायस्कूल या इंग्रजी शाळेत शिकत असताना श्रीकृष्ण केशव आंबेडकर या शिक्षकांनी आंबडवेकर या आडनाव ऐवजी माझे *आंबेडकर* आडनाव लावण्याचा सल्ला दिला. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमराव इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले डिसेंबर 1904 मध्ये मुंबई येथील लोअर परळ भागातील एल्फिन्सटन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळविला. या ठिकाणी बाबासाहेब यांना इतर मुलासोबत बसण्याचा अधिकार नव्हता, शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसावे लागे,शाळेतील पिण्याच्या भांड्याला व ग्लासला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता सेवकांनी वरून पाणी वोंजळीत टाकायचे आणि पाणी प्यायचे जर शाळेत सेवक आला नाही तर पाणी प्यायला नाही अशी अवस्था बाबासाहेबांची होती इ. स. 1996 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी 10 वर्ष वय असणाऱ्या दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या रमाबाई या मुलीशी विवाह झाला. भीमराव 18 – 18 तास अभ्यास करून 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले यानंतर कृष्णाजी केळुस्कर या शिक्षकाच्या मदतीने महाराज सयाजीराव गायकवाड यांची भेट घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी 25 रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शिफारस केली 1912 मध्ये राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयात बीए पदवी संपादन केली याच काळात बाबासाहेब यांना 12 जानेवारी 1912 मध्ये पहिला मुलगा यशवंत जन्माला आला. पुढे बडोदा येथील शिष्यवृत्तीच्या मदतीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रयान केले प्रदेशातून अर्थशास्त्रामध्ये पीएचडी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पदवी मिळवणारे देखील पहिले व्यक्ती होते. 1896 ते 1923 या 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्था मधून बीए दोन वेळा एम ए ,phd , एम एस सी आणि Bar at law ,Dsc या पदव्या तसेच LLD ,डिलीट इत्यादी पदव्या मिळून भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली.
भारतातील वर्ग लढायला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले अस्पर्शांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1920 मध्ये ‘ मूकनायक ‘ नावाचे पाक्षिक सुरू केले याच काळात 21 मार्च 22 मार्च 1920 मध्ये अस्पर्शांच्या परिषदाच्या माध्यमातून सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले डॉक्टर बाबासाहेब यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 20 जुलै 1924 मध्ये ‘बहिष्कृत हितकारणी सभा ‘ या संस्थेची स्थापना केली या माध्यमातून ‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा ‘हा महत्त्वपूर्ण नारा देण्यात आला भारतीय समाजातील सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात असलेल्या व्यक्तींच्या मनात धार्मिक व राजकीय हक्काबद्दल जागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश होता तसेच शाळा वस्तीग्रह ,ग्रंथालय सुरू करून शिक्षणाचा प्रसार प्रचार झाला पाहिजे हा महत्त्वाचा एक उद्देश होता.
19 मार्च व 20 मार्च 1927 मध्ये महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला या ठिकाणी पाणी हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात की हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे . कायदेशीर नागरी व मानवी हक्क अमलात आणण्यासाठी सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी आंदोलन यशस्वी केले .15 फेब्रुवारी 1928 मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह होय हा केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नसून हिंदू असूनही हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र व अशुद्ध होत नाही हे सिद्ध करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश होय. 2 मार्च 1930 मध्ये नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करण्यात आला आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत मंदिर प्रवेशामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत तर आपले प्रश्न हे राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक व शैक्षणिक आहेत उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कापासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवलेले आहे आता हेच लोक आपल्याला आपला मानवी हक्क देतील हा मुख्य प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून उच्चारला गेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचे समर्थक होते त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता कोणत्याही समाजाचे मूल्यमापन हे समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावर ठरत असते याकरिता डॉक्टर बाबासाहेब यांनी छत्रपती संभाजी नगर येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मुलींना प्रवेश दिला . खान कामगार स्त्रीला प्रसुती भत्ता ,पुरुषा एवढीच मजुरी ,बहुपत्नीत्व प्रथेला विरोध, कष्टकरी स्त्रियांकरिता 21 दिवसाची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई तसेच नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसुती रजा मिळून देणारे आंबेडकर जगातील पहिले व्यक्ती होते. 1947 मध्ये कायदेमंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव लोकसभेत मांडला परंतु काही सनातनी मंडळीच्या विरोधामुळे हे पारित होऊ शकले नाही यामध्ये स्त्रिया संबंधित अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी केल्या जाणार होत्या परंतु या बिलास विरोध झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 मध्ये कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ६५ वर्षाच्या संघर्षमय जीवनात जगण्यासाठी व शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्या पर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता त्यांनी आपल्या आयुष्यात शैक्षणिक विचार , सामाजिक क्रांती ,प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा ,शेतकरी शेतमजूर ,संविधान निर्मितीतील योगदान अशा अनेक बाबीवर कार्य करून जनसामान्याच्या मनामनावर नाव कोरलेले आहे अशा विश्वभूषण ,विश्वरत्न ,भारतरत्न , महामानव ,संविधान निर्माता ,युगपुरुष ,क्रांतीसुर्य , ज्ञान पंडित, महानायक प्रेरणेचा अखंड ऊर्जास्रोत, वैचारिक विचारांचा आधारवड बोधिसत्व डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा.
