तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनावे – आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी.नामदेव.मंडपे जालना
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
एम.एस.एम.ई. व भीम उद्योग अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन
प्रचंड कष्टाची तयारी, दुर्दम्य उत्साह आणि प्रखर सकारात्मक वृत्ती असल्याशिवाय उद्योजक घडत नाहीत – आमदार बबनराव लोणीकर
नव उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करणार – आमदार लोणीकर
आजच्या युगामध्ये अनेक जण नोकरीच्या मागे धावत असून नोकरी हेच आजच्या अनेक तरुणांचे अंतिम ध्येय बनले आहे. नोकरी हे अंतिम ध्येय न ठेवता आपण उद्योजक बनले पाहिजे. लघु, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म व्यावसायिकांसाठी सरकारी योजना, बँक कर्जसुविधा यांची मुबलक उपलब्धता आहे. पुण्यासारख्या शहरात हे व्यावसायिक या सोयी-सवलतींबद्दल जागृत आहेत. परंतु ते या सुविधांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे नव तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
जालना येथे हॉटेल सागर इन येथे संपन्न झालेल्या एम.एस.एम.ई. व भीम उद्योग अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना आ.लोणीकर पुढे म्हणाले की, कोणताही उद्योग व्यवसाय उभारायचा म्हटला की तीव्र इच्छाशक्ती असावी लागते पण फक्त तीव्र इच्छा असून चालत नाही. तुम्ही राबवत असलेल्या संकल्पनेला बाजारपेठही असावी लागते, आणि ही बाजारपेठ सातत्याने वाढती असावी लागते. या बाजारपेठेला काबीज करण्यासाठी शिस्त, सातत्य, चिकाटी आणि उत्तम व्यवस्थापन असावे लागते. प्रत्येकाला आपला उद्योग मोठा व्हावा असे वाटत असते. पण तो मोठा करण्यासाठी नेमके काय करावे याची जाणीव नसते त्यामुळे प्रयोग करण्यातच खूप वेळ जातो. जगातील मोठ्या उद्योगांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की या उद्योगांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याकरिता लागणारी सर्जनशीलता उद्योजकाकडे असावी लागते. पुरेसे भांडवल अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळ यांच्या जोरावर उत्पादकता वाढ साधायला हवी. व्यवसायसंस्थेतील कामांचा क्रम व वेळापत्रक ठरवून, वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करून, संभाव्य विक्रीचा अंदाज बांधून आणि विपणन संशोधन करून, प्रभावी मार्केटिंग करावे लागते. ग्राहकांचे मानस शास्त्र समजावून घेऊन, परिणामकारक जाहिरात व विक्रय वृद्धी योजना राबवाव्या लागतात. आजुबाजूच्या पर्यावरणात घडणारे बदल लक्षात घेऊन सतत अचूक आणि वेळेत निर्णय घ्यावे लागतात. संवाद कौशल्य आणि वाटाघाटींचे कौशल्य आत्मसात करावे लागते. आणि सर्वात शेवटी प्रचंड कष्टाची तयारी, दुर्दम्य उत्साह आणि प्रखर सकारात्मक वृत्ती असावी लागते. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.
नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे गरजेचे असून आर्थिक तरतूद नसल्यामुळे अनेक उद्योजक उद्योगाची उभारणी करू शकत नाहीत बँकेचे पाठबळ असणे अत्यंत आवश्यक आहे अशावेळी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होणे गरजेचे असून भीम उद्योग अभियान मार्फत ज्या उद्योजकांना नवीन उद्योगाचे विचार आणि करण्यासाठी प्रयत्न केले जातील त्या सर्व उद्योजकांच्या पाठीशी आपण काम करून उभे राहणार असून शासन स्तरावर त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कायम असा शब्द यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.
यावेळी भीम उद्योग अभियानाचे अध्यक्ष संजय भालेराव, राजेश राऊत, एम.एस.एम.ई. चे राहुल मिश्रा, नरेंद्र इस्टोलकर, मिलिंद काळे, मनोजकुमार शर्मा, शहादेव सातपुते, संतोष काळे, प्रकाश इनकर यांच्यासह अनेक नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
