अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
१सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान मंजूर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती
प्रतिनिधी. नामदेव मंडपे मंठा जालना
*परतुर तालुक्यासाठी 32 कोटी 61 लाख रुपये तर मंठा तालुक्यासाठी 55 कोटी 88 लाख रुपये अशी एकूण 88 कोटी 49 लाख रुपये एवढी अनुदानाची रक्कम प्राप्त – आमदार बबनराव लोणीकर*
*अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसामुळे अतिवृष्टी इतकेच नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील तात्काळ आणि सरसकट मदत करा – आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी*
*तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ अनुदानाच्या याद्या अपलोड कराव्यात – आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचना*
1 सप्टेंबर 2024 रोजी परतूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये अतिवृष्टी नसली तरी सततच्या पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे त्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी वारंवार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी लावून धरली होती, त्या मागणीला आता यश आले असून सदरील अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्या अनुदानाची रक्कम तहसीलदार मंठा व परतुर यांच्याकडे जमा झाली असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
परतुर तालुक्यामध्ये 57 गावात एक सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामध्ये 25 हजार 454 बाधित शेतकऱ्यांचा समावेश असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या स्वरूपात 32 कोटी 61 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर मंठा तालुक्यातील 85 गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये 45571 शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने 55 कोटी 88 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत असे मंठा व परतुर दोन्ही तालुके मिळून 71025 शेतकऱ्यांना 88 कोटी 49 लाख रुपये रक्कम प्राप्त झाली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
परतुर व मंठा तालुक्यातील मंठा, परतूर, श्रीष्टी व वाटुर अशी चार मंडळे 65 मिली पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे वगळण्यात आली होती. परंतु या सर्व मंडळांमध्ये सततच्या पावसामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. ही बाब माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या स्वतःच्या पावसामुळे देखील अनेक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्रव्यवहार करून आणून दिले होते. सततच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त शेतकऱ्यांना देखील सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी यापूर्वी देखील केली होती आणि आता देखील आपण या मागणीचा सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार लोणीकरांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मंजूर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांची यादी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून अपलोड करणे अपेक्षित आहे. परंतु अद्याप पर्यंत अनेक गावांमधून या याद्या अपलोड करण्यात आलेला नाहीत याची गंभीर दखल घेत आमदार बबनराव लोणीकर यांनी आज परतुर व मंठा या दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना कठोर शब्दात सूचना करत शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या खातात जमा करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची निष्काळजी पणा करू नये अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल अशा शब्दात सुनावले महसूल पंचायत व कृषी प्रशासनाच्या वतीने याची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ सर्व बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या तर आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.
