उरुळी कांचनमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट प्रशासन झोपेत! अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे!
उप संपादक:- गणेश महाडिक उरुळी कांचन
(ता.३०/०३/२०२६ हवेली) परिसरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढत असल्याची चिंताजनक स्थिती समोर येत आहे. गावातील जय मल्हार रोड, महात्मा गांधी विद्यालय शाळा परिसरात व बाजारतळ येथील खुलेआम जुगार अड्डे , उरुळी कांचन ची स्मशान भुमी समोर तर एक बंदिस्त रुम करुन राञी उशिरापर्यंत दारू विक्री होते. याच ठिकाणी शाळेची मुले- मुली व महिला वाहनाची वाट पाहत असतात त्यांना दारुड्यांचा नाहक ञास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहे. पण याठिकाणी ठोस कारवाही कधी करणार असे नागरिक सांगत आहेत. तसेच अनेक ठिकाणी दारू बंदी असताना खुलेआम दारू विक्री होते. व नशेली पान शॉपचा ही उद्रेक वाढत चालला असल्याने नागरिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यावर लगाम कधी बसणार?
बेकायदेशीर दारूविक्री, जुगार अड्डे आणि इतर अनधिकृत व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत.
नागरिकांच्या मते, शाळा परिसरात हा सर्व प्रकार सुरू असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असतात. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काहीवेळा कारवाई केली जाते, मात्र ती तात्पुरती ठरते आणि काही दिवसांत पुन्हा तेच प्रकार सुरू होतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, नियमित गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उरुळी कांचनसारख्या वाढत्या उपनगरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.








