पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
दिनांक : १७/०३/२०२६
पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” – लातूर पोलिसांचा अभिनव उपक्रम : शेतकऱ्यांच्या जमिनीवरील वादांना जागेवरच सामोपचाराने तोडगा.
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतजमिनीच्या बांधावरून, शेतरस्त्यांवरून तसेच मालकी हक्कांवरून उद्भवणारे वाद अनेक वेळा गंभीर स्वरूप धारण करतात. अशा वादांमुळे शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल होतात व काही वेळा गुन्हेगारी घटनांनाही खतपाणी मिळते. या सर्व प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पोलीस ठाणे, न्यायालयीन कामकाज व आर्थिक-मानसिक त्रास सहन करावा लागतो.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा अत्यंत संवेदनशीलतेने विचार करून “पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” हा अभिनव व लोकाभिमुख उपक्रम दिनांक १६ मार्च २०२६ पासून सुरू केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेताना एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली की,
“शेतकऱ्यांसाठी त्यांची जमीन ही केवळ मालमत्ता नसून ती त्यांच्या आयुष्याचा आधार, कष्टाचे प्रतीक आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे.”शेतीच्या छोट्या-छोट्या कारणांवरून निर्माण होणारे वाद वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, त्यातून शेजारी शेजाऱ्यांचे संबंध बिघडतात, आणि काही वेळा किरकोळ वाद मोठ्या गुन्ह्यांत परिवर्तित होतात. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी केवळ कायदेशीर कारवाई करण्याऐवजी मानवी दृष्टीकोनातून, संवादातून व सामोपचारातून प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे.
“पोलीस हे केवळ गुन्हे दाखल करणारे यंत्र नसून समाजातील तणाव कमी करणारे, विश्वास निर्माण करणारे आणि गरजूंना आधार देणारे माध्यम असावे” या विचारातूनच या उपक्रमाअंतर्गत संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार हे थेट गावामध्ये जाऊन वादग्रस्त शेतजमिनीवर भेट देत आहेत. दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, महसूल विभागाच्या नोंदींचा आधार घेत, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती समिती सदस्य व ज्येष्ठ व्यक्ती यांच्या उपस्थितीत पारदर्शक व न्याय्य पद्धतीने तोडगा काढला जातो.
या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक १७ मार्च रोजी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डोंगरे यांनी मौजे भातखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतीच्या जागेचा वाद सामोपचाराने निकाली काढला.
अर्जदार शिवराज धोंडीराम आचवले
यांच्या सुमारे ४ वर्षे जुने शेतीच्या सीमारेषेबाबत तंटा पोलीसांनी दोन्ही पक्षकारांना एकत्र बसवून त्यांच्या ज
मिनीचे दस्त तपासले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोजमाप करण्यात आले. पारदर्शक पद्धतीने सीमारेषा निश्चित करण्यात आली व दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटवला. दोन्ही पक्षकारांनी भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणार नसल्याचे मान्य करून पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.
“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” हा उपक्रम लातूर जिल्हा पोलिसांच्या लोकाभिमुख व विश्वासार्ह पोलिसिंगचा उत्कृष्ट नमुना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ न्याय मिळत नाही, तर त्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
*हा उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून, तक्रारी असलेल्या गावांना प्राधान्य देऊन पोलीस पथके तसेच संबंधित गावाचे मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल प्रशासनाची संबंधित व्यक्ती, गावातील तंटामुक्ती तसेच प्रतिष्ठित व्यक्ती असे मिळून सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शेती व जमिनीचे वाद सामोपचाराने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.*
*नागरिकांना आवाहन.*
शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी संदर्भातील वाद वाढण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाकडे मांडावेत. परस्पर सहमतीने व कायदेशीर मार्गाने वाद मिटविण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस सदैव तत्पर आहेत.








