हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थापनेला गती — आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख
हिंगणघाट परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हिंगणघाट येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे विधानसभेचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान कुणावार यांनी विधानभवनात सातत्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले होते.
या संदर्भात दिनांक १० मार्च रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेज हक तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सुद्धा उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रस्तावित हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिपूर्ण प्रस्तावावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रस्तावातील काही प्रशासकीय त्रुटी दूर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सुधारित प्रस्ताव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वासन दिले.
या प्रस्तावानुसार सुमारे १४६ पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हिंगणघाट तालुक्यातील वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने हे ग्रामीण पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
हिंगणघाट परिसरातील नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे आणि पोलिसांची सेवा ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावी या उद्देशाने आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आता या मागणीला प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









