२४ तास व्यवसाय परवानगीवर जळगावात संभ्रम दूर; एसपींकडून स्पष्ट आदेश
प्रतिनिधी प्रणित काठोके
जळगाव जिल्ह्यात राज्य सरकारने मध्यविक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देत आदेश जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. रात्री दहा नंतर दुकाने उघडी ठेवल्यास काही व्यापाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत संबंधित नियम स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देऊन लागू असलेल्या कायद्याची आठवण करून दिली.
यानंतर डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना स्पष्ट सूचना जारी केल्या. ज्या आस्थापनांना शासन नियमांनुसार २४ तास व्यवसायाची परवानगी आहे, त्यांना विनाकारण दुकाने बंद करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता २४ तास व्यवसाय परवानगीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








