अफूची बेकायदेशीर शेती उघड | १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त, दोन शेतकरी अटकेत
बुलढाणा प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील– सिंदखेडराजा तालुका येथील पांग्री काटे शिवारात अफूच्या बेकायदेशीर लागवडीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीनुसार छापा टाकत तब्बल १ कोटी ३२ लाख रुपयांचा अफूचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित शेतजमिनीत पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अफूची झाडे व बोंडे आढळून आली. तत्काळ पंचनामा करून संपूर्ण पीक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या झाडांची बाजारमूल्य अंदाजे १.३२ कोटी रुपये असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संबंधित दोन शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अफूची लागवड ही कायद्याने बंदी असताना परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर शेती केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यातील इतर भागातही अशा प्रकारची बेकायदेशीर शेती होत असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.








