मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे घरफोडी; सुमारे ५ लाख ९१ हजार दागिने लंपास
प्रतिनिधी | प्रणित काठोक
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करून तब्बल ५ लाख ९१ हजार ६९३ रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी रविंद्र भगवान चौधरी (वय ५१, रा. हनुमान मंदिराजवळ, हरताळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबीय सोबत घरातील वरच्या मजल्यावर झोपलेले होते ह्या परिस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, चैन, गळ्यातील दागिने, बांगड्या तसेच चांदीचे पैंजण आदी वस्तूंचा समावेश असून एकूण किंमत ५,९१,६९३ रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांची चौकशी करणे यासह विविध दिशांनी तपास सुरू आहे.
दरम्यान, गावात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत केला जात आहे
तपास अधिकारी राजेंद्र चाटे साहेब पोलीस हेस कॉन्स्टेबल संदीप वानखेडे पोलीस अमलदार सतीश भारुडे , दीपक ठाकरे








