- दीनदयाळ उपाध्याय:गरिबांचे कैवारी
प्रतिनिधी -सारंग महाजन.
११ फेब्रुवारी ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
२५ सप्टेंबर, १९१६ रोजी सूर्योदयाच्या
शुभ वेळी ‘दीना’ या नावाने नंतर लहानपणी घरात ओळखल्या जाणाऱ्या बालकाचा जन्म झाला. आई रामप्यारी आणि वडील भगवती प्रसाद यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या अगदीच सामान्य, किंवा खरंतर गरीबच होते. परिस्थितीचे लागोपाठ आघात दीनदयाळ वर झाले. तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे अचानक निधन झाले. या धक्क्यामुळे आईची तब्येत ही बिघडत गेली. क्षयरोग हुन चार वर्षानंतर आईचेही निधन झाले. त्यानंतर दीनदयाळ यांचे संगोपन. परंतु दीना दहा वर्षाचा असताना, ते सुद्धा स्वर्गवासी झाले. मामा
राधारमण यांनी दीनदयाळ च्या शालेय शिक्षणाकडे लक्ष दिले. परंतु याच दरम्यान त्यांचा अतिशय प्रिय लहान भाऊ शिवदयाळ याचा टायफाईड ने मृत्यू झाला. इतकी प्रतिकूलता असूनही, इतक्या मृत्यूचे धक्के पचवून दीनदयाळ अभ्यास करत होता. आजच्या सारख्या सुविधा त्या काळात नव्हत्या. सोबतच मामाचे उत्पन्नही साधारणच होते. त्यामुळे दीनदयाळ ला त्याच्यासोबत शिकणाऱ्या मामाच्या मुलाच्या पुस्तकांवर रात्रीच्या वेळी अभ्यास करावा लागत असे. पण याची तक्रार, किंवा कोणतेही भांडवल न करता दीनदयाळ मन लावून आपला अभ्यास करत होता. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे आणि प्रचंड परिश्रमामुळे त्या काळाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत तो शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. गणित हा त्याचा आवडता विषय होता. त्यातील भूमितीची दीनदयाळ ची उत्तर पत्रिका आदर्श उत्तरपत्रिका म्हणून अजमेर बोर्डात जपून ठेवण्यात आली होती. या दरम्यानचा एक प्रसंग दीनदयाळजींची विचार करण्याची पद्धत प्रकर्षाने दाखवून देतो. सिकरच्या राजांना या हुशार विद्यार्थ्यांची माहिती मिळाली. त्यांनी दीनदयाळ ला दरबारात बोलवून त्याचे कौतुक करत विचारले, ” बक्षीस म्हणून तुला काय देऊ?” महाराजांना आश्चर्यचकित करणारे उत्तर मिळाले, “मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या.” महाराजांचा आशीर्वाद तर मिळालेच सोबत एक सुवर्णपदक आणि पुढच्या अभ्यासासाठी विद्यावेतन प्राप्त झाले. पुढील सर्व शिक्षण हे साधारणतः शिष्यवृत्ती वरच दीनदयाळांनी पूर्ण केले.
आपल्या जीवनातील सर्व संकटांचा, दुःखांचा आणि आव्हानांना दीनदयाळजींनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यातून स्वतःचे दीनदयाळ अर्थात गरिबांचा कैवारी हे नाव त्यांनी सार्थक केले.
*सर्व मित्र दीनदयाळ*
दीनदयाळ हे स्वतः केवळ हुशार होते एवढेच नाही, तर शालेय जीवनापासूनच ते इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासात मदत करत. महाविद्यालयात तर त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण मंडळ तयार केले ज्याचे नाव ‘शून्य मंडळ’ असे ठेवले. अनेक अनुत्तीर्ण झालेल्या किंवा अनुत्तीर्ण होण्याची भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे इंटरच्या परीक्षेत उत्तीर्ण होता आले. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कामही या शून्य मंडळाने केले. इतरांना मदत करून सुद्धा इंटरच्या परीक्षेत दीनदयाळ सर्वाधिक गुणांचा विक्रम करत प्रथम क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकले.
*बूट पॉलिश वाला मुलगा*
दीनदयाळजी एकदा रेल्वेने प्रवास करत होते. एक थोडा मळकट कपड्यातला मुलगा चप्पल, बूट पॉलिश करण्यासाठी फिरत होता. दीनदयाळजींनी त्याच्याकडून आपले बूट पॉलिश करून घेतले. यामागचे कारण, त्यांना पॉलिश चे बूट घालण्याची आवड होती असे नाही तर यानिमित्ताने सामान्य किंवा गरीब व्यक्तींना त्यांच्या कामातून दोन पैसे मिळावे हेच होते. त्यांच्यासोबत प्रवासात सुटा बुटातले एक अधिकारी प्रवास करत होते. मुलाने त्यांनाही बूट पॉलिश करायचे आहेत का असे विचारले. त्या अधिकाऱ्यांनी मुलाला बूट स्वच्छ करण्यासाठी त्याच्याकडे कापड असेल तरच पॉलिश करण्याविषयी सांगितले. मुलाजवळ तसा कपडा नसल्यामुळे थोडासा नाराज होऊन तो तिथून निघू लागला, तेव्हा दीनदयाळजींनी त्याला थांबवून आपल्या बॅगमधून जुन्या कपड्या मधला एक तुकडा व्यवस्थित फाडून दिला आणि त्याला अधिकाऱ्याचे बूट सुद्धा पॉलिश करता आले. नंतर तो निघाला असताना दीनदयाळजींनी अगदी प्रेमाने त्याला सांगितले की ‘ बघ, आपल्याजवळ आपल्या कामासाठी आवश्यक सर्व साहित्य असले पाहिजे. आज कपडा नव्हता म्हणून तुझे नुकसान झाले असते’. कोणताही राग न करता किंवा आजूबाजूच्या स्थितीकडे दुर्लक्ष न करता दीनदयाळजी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत आणि त्यामुळेच ते खरे नावाप्रमाणे दीनदयाळ होते.
*बॅग उचलण्यासाठी हमाल करणे*
दीनदयाळजी अनेक वर्ष अखिल भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे सरचिटणीस होते. पक्ष कार्यासाठी सातत्याने प्रवास करत. एकदा बंगलोर प्रवासातली घटना पहा. पंडितजी स्टेशनवर गाडीतून उतरले. कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि नंतर बॅगा उचलून बाहेर निघू लागले. तेवढ्यात तिथे एक हमाल सुद्धा आला. दीनदयाळजींनी कार्यकर्त्यांना थांबवले आणि त्या हमालाला बोलावून बॅग बाहेर नेण्यासाठी सांगितले. खरं म्हणजे कार्यकर्त्यांनी बॅग स्वतः स्वतः नेण्याचा आग्रह सुद्धा केला, परंतु दिनदयाळजींनी हसून तो नाकारला. हमालाने गाडीमध्ये सामान ठेवल्यानंतर त्याचे योग्य पैसे त्याला दिले. नंतर कार निघाल्यावर दीनदयाळजी कार्यकर्त्यांना प्रेमाने, सौजन्याने म्हणाले “भैय्या, सामान जर तुम्हीच वाहून नेले तर हमालीवर जगणारे आपले बंधू काय कमावतील, त्यांचे घर कसे चालेल याचा तुम्ही विचार केला आहे का?”
सामान हमाला कडे देण्याचे कारण कार्यकर्त्यांना या छोट्या कृतीतून लक्षात आले. केवळ अंत्योदयाचा विचार दीनदयाळजींनी मांडला नाही, तर तो सहजपणे अमलातही आणलेला होता.
* डोळस मदत
गरजूंना आणि गरिबांना मदत करणे हे आवश्यक तर आहेच, परंतु ती मदत करताना सुद्धा योग्य व्यक्तीला मदत झाली पाहिजे हे एका प्रसंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या इथे नेहमी सांगतात की दान हे सत्पात्री असलं पाहिजे. म्हणजे तो व्यक्ती दान देण्या योग्य आहे किंवा नाही हे पाहूनच मदत केली पाहिजे.
एकदा प्रवासामध्ये दीनदयाळजींसोबत एक श्रीमंत सहप्रवासी होते. डब्यात एक धडधाकट भिकारी देवाच्या नावाने भीक मागू लागला. त्या श्रीमंत व्यक्तीने खिशातून एक नाणे भिकाऱ्याच्या कटोऱ्यात टाकण्यासाठी काढले. पंडितजींनी हळुवारपणे त्यांना थांबवले. काही वेळानंतर डब्यामध्ये एक आंधळा भिकारी मीराबाईची भजने गात लोकांना मदतीची मागणी करत होता. पंडितजींनी आता त्या श्रीमंत सहप्रवाशाला सांगितले की आधीचे नाणे तुम्ही देणार होता ते आता तुम्ही देऊ शकता. सहप्रवाशाने
तसे केले. परंतु नंतर त्यांना विचारले की दोघेही तर भिकारीच आहेत मग आधी त्यांनी नाणं देण्यापासून का थांबवलं.
दीनदयाळजी म्हणाले ‘ पहिला भिकारी धडधाकट होता, कोणतंही काम तो करू शकत होता. त्यामुळे त्यानी कष्ट करून आपले पोट भरले पाहिजे. त्याचे भिक मागणे हे समाजाला आणि देशाला लांछन आहे. दुसरा भिकारी आंधळा असून सुद्धा गायन कला देवाचं नाव घ्यायला आणि सोबत पोट भरायला उपयोगात आणतो आहे.” डोळस मदत कशी करावी याचा हा एक उत्तम परिपाठ त्यांनी या प्रसंगात घालून दिला आहे.
*फिरते सलून*
दीनदयाळजींची वेशभूषा नेहमीच अगदी साधी असायची. सामान्य माणसांशी बोलणं सुद्धा अगदी सामान्य माणसाप्रमाणे! त्यामुळे ते कोणी नेते आहेत असं ते सहज कुठे फिरताना पाहणाऱ्याला वाटायचं नाही. एकदा लखनऊ येथे असताना कार्यक्रम किंवा सभा असल्यामुळे पंडितजींना केस कापून घ्यायचे होते. ते कार्यालयातून निघाले आणि नेहमीचे केश कर्तनालय बंद असल्यामुळे थोडा शोध घेऊ लागले. परंतु कुठे गर्दी जास्त तर काही कारणाने काही दुकानं बंद ! थोड्या वेळाने ते परत कार्यालयात आले. सोबतच्या कार्यकर्त्यांनी केस कुठे कापले म्हणून विचारलं तेव्हा फिरत्या सलून मध्ये असं उत्तर दीनदयाळजींनी दिलं. स्पष्टीकरण देताना त्यांनी रस्त्यावर धोपटे घेऊन फिरणाऱ्या आणि पोतं टाकून केस कापणाऱ्या व्यक्तीकडे केस कापून घेतले होते हे त्यांनी सांगितले . ते म्हणाले “माझ्यापाशी जास्त वेळ नव्हता, त्याच्याकडे गिऱ्हाईक नव्हते ; दोघांचीही सोय झाली.” एका गरजू कारागिराला संधी दिली, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. दीनदयाळजींच्या जीवनात श्रमाचे थोडे पैसे गरिबांना मिळावे, याला महत्व होते. सोबतच अशा निमित्ताने सामान्य लोकांच्या तसेच गोरगरिबांच्या समस्या काय आहेत ते सहज गप्पा करताना माहीत करून घेत. या माहितीचा उपयोग ‘ *अंत्योदय’* ही कल्पना साकार करण्यासाठी त्यांनी निश्चितच करून घेतला.
*हर हाथ को काम – हर खेत को पानी*
दीनदयाळजींचा स्वावलंबी भारत स्वातंत्र्यानंतर लवकरात लवकर झाला पाहिजे हा आग्रह होता. त्यावेळी पूर्णतः कृषीप्रधान असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे क्षेत्र अधिकाधिक प्रगत होण्यासाठी हर हाथ को काम – हर खेत को पानी, हा नारा पंडितजींनी दिला होता. त्यामधे जनसामान्यांचा विकास झाला पाहिजे तसेच ७० टक्के भारतीय जनता कृषी आणि कृषी संबंधित रोजगारावर अवलंबून असल्यामुळे ते रोजगार सुरक्षित राहिले पाहिजे हा सुद्धा त्यांचा विचार होता.
भारत सरकारने त्यादरम्यान अमेरिकेतून गहू आयात करण्यासाठी पी एल ४८० असा करार केला. या कराराला पंडित दीनदयाळजींनी संपूर्ण ताकतीने विरोध केला. यामध्ये दोन मुद्द्यांचा प्राधान्याने ते उल्लेख करत असत. एक तर अन्नधान्याच्या बाबतीत स्वतंत्र भारताने स्वयंपूर्ण, स्वावलंबी होणे आवश्यक आहे. दुसरा भाग म्हणजे अमेरिका या कराराचा उपयोग भारतावर काश्मीर प्रश्नावर वाटाघाटी संबंधी दडपण आणण्यासाठी करू शकतो आणि त्यामध्ये पाकिस्तानचा फायदा आणि भारताचा तोटा होऊ शकतो. आणि त्यामुळेच अमेरिकन गव्हाच्या आयातीवर जनतेने पूर्ण शक्तीने विरोध करावा वेळ आल्यास बहिष्कार टाकावा, असेही आवाहन त्यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आजही विकसित भारतासाठी आणि बंधू भावाच्या आधारावर मानवी समाज चालण्यासाठी सुसंगत आहेत. त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.
*प्रा.डॉ. केदार ठोसर*
*चिखली*








