बार्शीतील गुन्हेगार टोळी एक वर्षासाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कठोर कारवाई
बार्शी : प्रतिनिधी रणजीत मस्के
बार्शी शहर व तालुक्यात दहशत माजवून खंडणी, मारहाण, महिलांची छेडछाड व दमदाटीचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुल वि. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कडक कारवाई केली.
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये टोळी प्रमुख मोहसिन साबीर तांबोळी याच्यासह शहाबाज जहाँगीर शेख, इब्राहिम राजअहमद शेख व अखिल इब्राहिम सय्यद (सर्व रा. बार्शी) यांचा समावेश आहे. या टोळीविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी करून पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले.
सदर टोळीने सोलापूर जिल्हा व बार्शी तालुक्यात घातक हत्यारांचा वापर करून मारहाण, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ, महिलांची छेडछाड व जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. यातील काही सदस्यांवर यापूर्वीही प्रतिबंधक कारवाया व हद्दपारी करण्यात आली होती; मात्र त्यांच्यात सुधारणा न झाल्याने अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले.
हद्दपार केलेले इसम आदेशित क्षेत्रात आढळल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. भविष्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या इसमांविरोधातही प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बार्शी शहर पोलिसांनी केली.








