पालघरमध्ये औषधांच्या नावाखाली परदेशी दारूची तस्करी; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी मुकुंद मोरे
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका मोठ्या कारवाईत औषधांच्या नावाखाली होणारी दारू तस्करी उघडकीस आणली आहे. औषधांचे बॉक्स असल्याचे सांगून गोवा बनावटीच्या परदेशी दारूची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडण्यात आला असून, या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने पालघरमधील खानीवडे टोल नाका परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारा एक आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. ४७ ए.एस. २८५० पथकाने अडवला.
जेव्हा अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी सुरू केली, तेव्हा वाहन चालकाने सुरुवातीला या वाहनात औषधांचे बॉक्स असल्याचे सांगितले. वरकरणी पाहता या बॉक्सवर औषधांचे लेबल्सही लावण्यात आले होते, ज्यामुळे कोणालाही संशय येऊ नये. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली असता, या औषधांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची महागडी विदेशी दारू लपवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा ‘औषध तस्करी’चा बनाव रचला होता.
या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ७६ लाख ६५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनाचा चालक पूर्णानंद परिहार याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दारू साठा नक्की कोठून आणला गेला आणि कोणाला विकला जाणार होता, याचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत








