“ग्रामीण-शहरी तरुणांमध्ये अफाट क्रीडागुणवत्ता” – डॉ. उद्धव शिंदे
क्रॉस कंट्रीत यशस्वी ठरलेल्या प्रथमेश राठोडचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
अहिल्यानगर : खेळाडू घडवण्यासाठी समाजातून मिळणारे प्रोत्साहन महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित २०२५–२६ या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या प्रथमेश राजु राठोड याचा स्नेहबंधच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथमेश ने कठीण स्पर्धात्मक वातावरणात उत्कृष्ट धावपटूत्व दाखवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल व स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते प्रथमेश राठोड यास सन्मानपत्र व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “खेळ ही शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वास घडवणारी प्रक्रिया आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच मोठे यश मिळवू शकतात. प्रथमेश राठोड सारखे खेळाडू जिल्ह्याचे नाव उज्वल करतील.”








