मोहाळा गावात चाकू हल्ला; महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काल घडलेल्या धक्कादायक घटनेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोट तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल मोहाळा गावात काही कारणावरून जुना वाद. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून हल्ल्यातील संशयितांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिदायत पटेल हे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते आणि त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोहाळा गावात गर्दी केली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हिदायत पटेल यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.








