स्वा. सै. पं. ध. थेपडे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
म्हसावद ता. जि. जळगांव : येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक विद्यालयात आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शालेय परिवारातर्फे सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. जी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. के. पी. पाटील यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर सादरीकरण केले. कु. तेजस्विनी चिंचोरे, वैभवी चव्हाण आणि ‘आरोही ग्रुप’च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषणे आणि कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. बच्छाव सर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ विद्यालयातील सर्व शिक्षिका भगिनींना या कार्यक्रमात विचार मंचावर विशेष स्थान देण्यात आले होते. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस. के. भंगाळे सर आणि ज्येष्ठ शिक्षकवृंद देखील मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन इयत्ता नववी ‘अ’ चा विद्यार्थी मयुरेश धनगर याने अत्यंत नेटक्या पद्धतीने केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








