संघर्षातून सुवर्णशिखराकडे………………..
एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या श्वेता कोवेची ऐतिहासिक कामगिरी
दुबईत घुमले गडचिरोलीचे नाव – भारतासाठी सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर गौरव
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी श्री. मनोज उराडे, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली
स्वप्न पाहण्याचाही अधिकार जिथे अनेकदा परिस्थिती हिरावून घेते, अशा दुर्गम आणि आव्हानांनी भरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून एक तेजस्वी प्रेरणाकथा आज संपूर्ण देशासमोर उभी राहिली आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीच्या जोरावर कु. श्वेता मंजु भास्कर कोवे हिने थेट आंतरराष्ट्रीय क्रीडांगणावर सुवर्णपदक जिंकत “अडथळे थांबवू शकतात, स्वप्ने नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दुबई येथे दि. 8 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्स या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्वेताने धनुर्विद्या (कंपाऊंड राऊंड) या प्रकारात अफाट अचूकतेने लक्ष्यभेद करत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. यासोबतच सांघिक कांस्यपदक मिळवत तिने भारतासाठी दोन आंतरराष्ट्रीय पदकांची ऐतिहासिक कमाई केली आहे. तिच्या प्रत्येक बाणासोबत गडचिरोलीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख आणि भारताचा तिरंगा उंचावत गेला.
श्वेताच्या या यशाने केवळ एक पदक मिळालेले नाही, तर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील असंख्य मुला-मुलींच्या मनात नवी आशा पेरली आहे. अपंगत्व, मर्यादा, दारिद्र्य किंवा दुर्गमतेच्या भिंती इच्छाशक्तीपुढे किती तोकड्या ठरतात, याचा जिवंत दाखला श्वेताने दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाळे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने कु. श्वेता कोवे हिचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले,
“कु. श्वेता कोवे हिची कामगिरी केवळ क्रीडाक्षेत्रातील यश नाही, तर ती मानवी जिद्दीचा विजय आहे. तिच्या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली असून ती प्रत्येक नवोदित खेळाडूसाठी प्रेरणास्रोत ठरेल,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आज सुवर्णपदकाच्या झळाळीत न्हालेली श्वेता ही खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी (ता. चामोर्शी) येथील महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. वर्ग आठवीपासून तिने धनुर्विद्या या खेळाची निवड केली. नियमित सराव, कठोर शिस्त, अनेक अपयशांना सामोरे जातही न डगमगणारा आत्मविश्वास आणि यशासाठी दिलेली प्रत्येक दिवसाची झुंज—या साऱ्याचा आज सुवर्ण फळासारखा प्रत्यय आला आहे.
सध्या तिचा सराव खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी येथे सुरू असून प्रा. डॉ. श्याम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिला उच्च दर्जाचे तांत्रिक व मानसिक प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास यामुळेच श्वेता आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर यशस्वी ठरली आहे. गडचिरोलीच्या मातीत जन्मलेली ही सुवर्णकन्या आज संपूर्ण देशाचा अभिमान बनली आहे. तिची यशोगाथा ही केवळ एका खेळाडूची कथा नसून, ती संघर्ष, आशा आणि विजयाची अमर गाथा आहे.









