पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
पुणे सह संपादक गणेश महाडिक
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या अनुषंगाने पोलीस विभागाकडील आवश्यक कार्यवाहीच्या अनुषंगाने समन्वय साधण्याकरिता बैठक घेतली. सदर बैठकीस रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, संदीप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त विशेष शाखा, अर्चना गायकवाड पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवडणूक कार्यक्रम कालावधी ची माहिती देऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस विभागाशी संबंधित विविध कक्ष स्थापन करणे, तसेच विविध कक्षांमध्ये पोलीस विभागाचे समन्वय अधिकारी नेमणे याबाबतची माहिती देण्यात आली, आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी करता व्हिडिओ सर्वेलन्स पथक, भरारी पथक, स्टॅटिक सर्वेलन्स टीम, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, झोनल अधिकारी, निवडणूक निरीक्षक, ईव्हीएम स्ट्रॉग रूम, साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र, मतमोजणी केंद्र, एक खिडकी योजना तसेच ईव्हीएम यंत्रांच्या वाहतुकी करिता आवश्यक सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती करणे या अनुषंगिक निवडणूक विषयक कार्यवाही पोलीस विभागाकडून होणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांच्या प्रचाराकरिता सर्व प्रकारच्या जाहीर सभा, तात्पुरते प्रचार कार्यालय, ध्वनिक्षेपक परवानगी, मिरवणूक / रोडशो, प्रसार माध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणन याबाबतची कार्यवाही देखील पोलीस विभागामार्फत करण्यात येते. यावर रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त यांनी निवडणूक पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आवश्यक ते नियोजन करण्यात आले असल्याचे तसेच निवडणूक कामी पुणे महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तदनंतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांचे समवेत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीच्या सुरुवातीस राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना सार्वत्रिक निवडणूक, २०२५-२०२६ च्या अनुषंगाने प्राथमिक माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उप आयुक्त तथा नोडल अधिकारी, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र यांनी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्राबाबत तयार करण्यात आलेल्या online प्रणालीची माहिती दिली. त्यावर थकबाकी ना हरकत प्रमाणपत्राबाबत तयार केलेली सदर online प्रणाली सुलभ असल्याचे तसेच यामध्ये नाव नोंदणी व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय सहज व सोपी झाली असल्याचे नमूद करून उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी पुणे मनपाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले.
बैठकीमध्ये उपस्थित प्रतिनिधी यांनी शपथ पत्राचा नमुना, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, नावात दुरुस्ती, इत्यादीबाबत प्रश्न मांडले. सदर प्रश्नांचे मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) तथा निवडणूक अधिकारी व इतर मनपा अधिकारी यांनी निराकरण केले. तसेच, प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करणेबाबत सर्व संबंधित निवडणूक अधिकारी यांना सूचित केले.









