शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
विशेष प्रतिनिधि….स्वप्निल पाटील एरंडोल
एरंडोल येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तर सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी करत कार्यक्रमाची संकल्पना प्रभावीपणे मांडली. कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या दिशेने सातत्यपूर्ण वाटचाल करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना कंफर्ट झोनमधून बाहेर पडून स्पर्धेच्या जगाचा सामना करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला. “आज घेतलेला कष्टांचा मार्गच उद्याचे भविष्य उज्ज्वल घडवतो,” असेही त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या प्रेरणादायी संदेशानंतर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध स्पर्धा, क्विझ स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवकल्पना, विज्ञान आणि सामाजिक जाणीव यांवर आधारित सादरीकरणांद्वारे उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाबाबत अभिप्रायही संकलित करण्यात आला, ज्याच्या आधारे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थी व संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक गती देण्यावर भर राहणार आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्या उत्साही उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार आणि यशस्वी ठरला.
कार्यक्रमाची सांगता प्रा. अनुप कुलकर्णी यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. संपूर्ण आयोजनात प्रा. जावेद शेख तसेच इतर प्राध्यापक वृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. शास्त्री फार्मसी महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला.









