डॉ. आदित्य रोडगे परभणी जिल्ह्यातील दुसरे एम.डी. रेडिओलॉजिस्ट; श्रीराम प्रतिष्ठानतर्फे गौरव.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य व सॅनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. आदित्य रोडगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय (MGM Medical College) येथे एम.डी. रेडिओलॉजीची पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. परभणी जिल्ह्यातून एम.डी. रेडिओलॉजिस्ट पदवी प्राप्त करणारे ते केवळ दुसरे डॉक्टर ठरले असून हा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक अत्यंत उल्लेखनीय टप्पा मानला जात आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानतर्फे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. आदित्य रोडगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, प्रगती शिरसागर, प्रिन्स इंग्लिश स्कूल, डॉ. बबन सोनवणे, प्रा. अशोक बोडके, प्रा. अक्षय बन आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी भावना व्यक्त करताना डॉ. आदित्य रोडगे म्हणाले, “एम.डी. रेडिओलॉजीची पदवी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. या प्रवासात अनेक आव्हाने आली, पण कुटुंबाचे प्रेम, मार्गदर्शकांचे पाठबळ आणि श्रीराम प्रतिष्ठान कडून मिळालेली निस्वार्थ साथ यामुळे मी हे स्वप्न पूर्ण करू शकलो. माझ्या प्रत्येक यशामागे माझे आई–वडील, माझी बहीण डॉ अपूर्वा रोडगे पारवे, डॉ. गणेश पारवे माझे आजोबा तसेच मला जपणारे शिक्षक आहेत—ही भावना शब्दांत सांगणे कठीण आहे.”“ही पदवी माझ्यासाठी फक्त कौशल्याचा परवाना नाही, तर समाजाप्रती अधिक संवेदन शीलतेने सेवा करण्याची नवी जबाबदारी आहे. पुढील काळात ग्रामीण भागातील लोकांना उत्तम निदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांचे मी सदैव ऋणी आहे. हा मान मला पुढील वाटचालीत आणखी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देतो.”कार्यक्रमाला श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्व मान्यवरांनी डॉ. आदित्य रोडगे यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या सत्कार समारंभामुळे श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात आणखी प्रेरणा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.









