नऊवारी : परंपरेचा साज आणि सिनेमॅटिक कथानाट्याचा मिलाफ”
प्रतिनिधी सारंग महाजन.
पुणे : सनिधप ओरिजनल्स या YouTube चॅनेलवर प्रदर्शित झालेले ‘नऊवारी’ हे गाणे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आले असून, काही दिवसांतच ते मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील यांनी या गाण्यात सादर केलेले नृत्य अत्यंत प्रभावी, नाजूक आणि दमदार आहे. त्यांच्या अभिव्यक्तीतून मराठी स्त्रीचे सौंदर्य आणि सामर्थ्य उत्तमरीत्या प्रकट होते.
या गाण्याचे दिग्दर्शन मनिष शिंदे यांनी केले आहे. त्यांनी लावणीला केवळ नृत्य सादरीकरण न ठेवता, कथानक व सिनेमॅटिक प्रस्तुती यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. सेट, वेशभूषा, रंगसंगती आणि प्रकाशयोजना यांच्या माध्यमातून उभारलेले ऐतिहासिक वातावरण प्रेक्षकांना जणू भूतकाळातील एका दरबारी प्रसंगात नेते. विशेष म्हणजे, गाण्याच्या शेवटी येणारा नाट्यपूर्ण ट्विस्ट गाण्याला वेगळे वजन आणि विशेष आकर्षण प्रदान करतो.
गाण्याचे गीत आणि संगीत पंकज वारुंगसे यांचे असून, प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाने गाण्यात जिवंतपणा आणि आत्मा भरला आहे.

या संपूर्ण प्रकल्पाचे निर्माते व गायक डॉ. विवेक इंगळे आहेत. त्यांनी कलाकारांची योग्य निवड, निर्मिती प्रक्रिया, कलात्मक गुणवत्ता आणि सांस्कृतिक प्रामाणिकता यांची काळजीपूर्वक जुळवाजुळव करून, “नऊवारी” हे गाणे दर्जेदार, मराठमोळी आणि अभिमानास्पद कलाकृती म्हणून साकारले.









