‘मग त्या बोगस मतांचा भाजपला फायदा होणार होता का?’; शिवसेना (UBT) नेते केदार दिघेंचा सवाल, दुबार मतं रद्द करण्याची मागणी
संपादक संतोष लांडे
ठाणे:भाजपचे आशिष शेलार यांनी दुबार मतांबाबत मुस्लिम दुबार मतेही असल्याचे वक्तव्य केल्या नंतर आणि दुबार मते असल्याचे एक प्रकारे मान्य केल्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांनी शेलार यांचा ट्विटच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.”मुस्लिम दुबार मतं” असल्याची माहिती असूनही भाजपने ती मतदार यादीतून का वगळली नाहीत, असा थेट सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे.
केदार दिघे यांनी प्रसिद्ध केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “एकतर मुस्लिम मतं भाजपाला मिळत नाहीत असं भाजपचंच म्हणणं आहे. दुसरीकडे, भाजपाचा मतदार यादीवरील अभ्यासही खूप आहे. मग मुस्लिम दुबार मतं आहेत हे माहित असतानाही निवडणूक आयोगाला सांगून भाजपने ती नावं कट का केली नाहीत?”
भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना केदार दिघे पुढे म्हणाले, “जर ती नावं कट केली नाहीत, याचा अर्थ त्या दुबार किंवा बोगस मतांचा भाजपाला फायदा होईल असं त्यांना वाटत होतं का? ओरिजनल मतं मिळणार नाहीत म्हणून ही दुबार नावं कुणी टाकली होती का? सत्य काय आहे?”
आपल्या पोस्ट मध्ये शेवटी, केदार दिघे यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्ट मागणी केली आहे. “कारण कोणतंही असो, आमची एकच मागणी आहे की, मतदार यादीतील सर्व दुबार मतं रद्द करण्यात यावीत,” असे त्यांनी म्हटले आहे. दिघे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.








