रायगड स्वाभिमान आणि अजिंक्य महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा परिणाम महसूल विभाग जागृत;
पण ‘चोर सोडून संन्यासींना फाशी’! चौहट्टा बाजारातील अवैध रेती प्रकरणात वीट भट्ट्यांवर कारवाई सुरू
अकोट प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
रायगड स्वाभिमान आणि अजिंक्य महाराष्ट्र न्यूज या माध्यमांनी सातत्याने उघड केलेल्या चौहट्टा बाजार येथील अवैध रेती प्रकरणावर अखेर महसूल विभाग जागृत झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक दिवसांपासून या भागात शासनाचे लाखो रुपये बुडवून अवैधरित्या रेती उपसा सुरू होता. स्थानिक प्रशासनावर आरोप होता की महसूल विभागातील काही अधिकारी या रेती माफियांना आशीर्वाद देत आहेत.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल विभागाने तातडीने हालचाल करत काही वीट भट्ट्यांवर कारवाई सुरू केली. मात्र, या कारवाईत खरे रेती माफिया आणि मोठे दलाल सुरक्षित राहिले असून, किरकोळ वीटभट्टी मालकांवरच कारवाई होत असल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे.
जनतेत चर्चेला उधाण आले असून, “चोर सोडून संन्यासींना फाशी” असा आरोप नागरिक करत आहेत. महसूल विभागाने जर खरोखरच पारदर्शक चौकशी केली तर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघड होऊ शकतो, असा दावा स्थानिक समाजसेवकांनी केला आहे.
दरम्यान, पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले असून, खऱ्या दोषींवर कधी आणि कशी कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









