राज्याचा “जनआरोग्य सेवा गौरव पुरस्कार-२०२५” सुरेंद्र इरपनवार यांच्या नावावर — आरोग्य सेवेतील योगदानाचा राज्यस्तरीय सन्मान
मनोज उराडे प्रतिनिधी :
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या कार्यात झोकून देणाऱ्या सुरेंद्र इरपनवार यांच्या उल्लेखनीय कार्याचा राज्य शासनाने गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे देण्यात येणारा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे जनआरोग्य सेवा गौरव पुरस्कार-२०२५” यंदा इरपनवार यांच्या नावावर घोषित झाला आहे. पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात, या पुरस्काराचे वितरण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण , आयुष्मान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी इरपनवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना राज्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे संबोधले. इरपनवार यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत उपचाराच्या योजनांचे फायदे पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अनुकरणीय ठरले आहे.
या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशाने यवतमाळ जिल्ह्याचा मान अधिक उंचावला आहे.








