गुन्हेगारी मुक्त गाव आपली जबाबदारी, आपला अभिमान” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र यशस्वीरीत्या पार पडले
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्हा पोलीस दलाची पुढाकार
रायगड, 15 ऑक्टोबर 2025: महाराष्ट्र पोलीस व स्वदेस फाउंडेशन ग्रामीण सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारी मुक्त गाव – आपली जबाबदारी, आपला अभिमान या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आज झूम मीटिंगच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून ग्रामीण समाजातील नागरिकांना सजग, जबाबदार आणि गुन्हेगारीविरोधी भूमिकेचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी विशेषतः कातकरी, आदिवासी व इतर वंचित समाजातील मुलींच्या लहान वयात होणाऱ्या गरोदरपणासारख्या संवेदनशील विषयांवर सखोल प्रबोधन केले. महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच, ग्रामीण भागांमध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार व इतर गुन्हेगारी प्रवृत्ती यांविरोधात पोलीस प्रशासनाने उचललेल्या ठोस पावले आणि उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांनी अशा प्रकारांबाबत कोणतीही गोपनीय माहिती दिल्यास ती विशेष व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, मात्र खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे स्वदेस ज्ञानमित्र सायली कार्लेकर यांनी आंचल दलाल यांच्यासोबत घेतलेली संवादात्मक चर्चा. या चर्चेत अनेक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी थेट प्रश्न विचारले व त्यांना योग्य दिशा देणारी समाधानकारक उत्तरे मिळाली. या मुक्त संवादामुळे सत्र अधिक प्रभावी व परिणामकारक ठरले.
कार्यक्रमाच्या शेवटी आंचल दलाल तसेच स्वदेस फाउंडेशन यांचे उपस्थितांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या सत्राने “गुन्हेगारी मुक्त गाव” या संकल्पनेला ग्रामीण पातळीवर अधिक बळकटी दिली.
या कार्यक्रमाच्या वेळी स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे आणि वरिष्ठ समन्वयक स्वप्निल स्वामी तसेच सर्व पोलिस स्टेन्शन प्रभारी उपस्थित होते.








