माओवाद पर्वाच्या समाप्तीची सुरुवात!
सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवादींचे सशस्र आत्मसमर्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : “माओवाद १०० टक्के हद्दपार होईल!
मनोज उराडे, जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- राज्याच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला! दंडकारण्याच्या जंगलातून उठलेली माओवादी चळवळ आज शस्त्र ठेवून संविधानाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वोच्च माओवादी नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह तब्बल ६१ माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण करून लोकशाहीचा स्वीकार केला.
या ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी घोषित केले “ही केवळ आत्मसमर्पणाची घटना नाही, तर माओवाद पर्वाच्या समाप्तीची सुरुवात आहे. गडचिरोलीने या लढाईचे नेतृत्व केले, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे!”
इतिहास बदलणारे आत्मसमर्पण एकूण ६१ माओवादी सदस्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण केले. या सर्वांनी माओवादी गणवेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर संविधानाची प्रत स्वीकारत मुख्य प्रवाहात प्रवेश केला. या वेळी पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला, गुप्तवार्ता आयुक्त शिरीष जैन, विशेष कृतीचे एडीजी डॉ. छेरिंग दोरजे, आयजी संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एसपी निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.
“४० वर्षांनंतरचा ऐतिहासिक क्षण”
मुख्यमंत्र्यांनी भावनिक शब्दात सांगितले “ज्या भूपतीने ४० वर्षांपूर्वी अहेरी–सिरोंचा परिसरात माओवाद सुरू केला, त्याच व्यक्तीने आज संविधानाचा स्वीकार केला आहे! हा देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “उत्तर गडचिरोलीत माओवाद संपला, आता दक्षिण गडचिरोलीही मोकळा होत आहे. उरलेले काही माओवादी शस्त्र खाली ठेवून येतील, अन्यथा परिणामांना तयार राहावे लागेल.”
संविधानच समतेचा खरा मार्ग
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की माओवादी चळवळीने युवकांना दिशाभूल केली, परंतु आता सत्य समोर आले आहे
> “समता आणि न्याय हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातूनच मिळू शकते, बंदुकीतून नाही.”
राज्य सरकारची पुनर्वसन ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले –
“आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे पुनर्वसन हेच आमचे कर्तव्य. रोजगार, शिक्षण आणि सन्मान यांसह त्यांना नवजीवन देऊ.”
आज आत्मसमर्पण करणाऱ्यांना एकूण ₹३.०१ कोटींचे बक्षीस, तर गडचिरोली पोलिसांना₹१ कोटींचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
केंद्र सरकारची रणनीती – दोनच पर्याय!
फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ‘२०२६ पर्यंत माओवादाचा पूर्ण अंत’ ही ठाम रणनीती राबवली जात आहे. आता पर्याय दोनच आत्मसमर्पण करा किंवा कायद्याच्या कारवाईला सामोरे जा!”
गडचिरोली – विकासाचा आणि शांतीचा मार्ग
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, “गडचिरोली आता स्टील मॅग्नेट बनत आहे! ९० टक्के स्थानिकांना रोजगार, ५ कोटी झाडे आणि हरित औद्योगिक विकासाचा संकल्प हा नव्या गडचिरोलीचा नकाशा आहे.”
पोलिस दलाचे शौर्य आणि नागरिकांचा विश्वास
एसपी श्री. निलोत्पल यांनी माहिती दिली की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवादी अटकेत, ८१ आत्मसमर्पित, आणि ९३ जहाल माओवादी कंठस्नान घालण्यात आले आहेत. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलाचे अभिनंदन करून “हे शौर्य म्हणजे नव्या गडचिरोलीचा पाया आहे” असे गौरवोद्गार काढले. “आजची घटना केवळ माओवाद्यांचे आत्मसमर्पण नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस










