गडचिरोलीचा अभिमान
आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान!
महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड — दुर्गम भागात प्रशासनाची नवीन दिशा!
मनोज उराडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दि. १७/१०/२०२५ : दुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याला देशभरात मानाचा मुकुट प्राप्त झाला आहे! आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना “उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आज झालेल्या या भव्य सोहळ्यात श्री. पंडा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

दुर्गम गडचिरोलीत प्रशासनाचा “नवा आदर्श मॉडेल”
गडचिरोली जिल्हा म्हणजे १४,४१२ चौ.किमी.चा विस्तीर्ण परिसर, ७० टक्के वनक्षेत्र आणि ३८ टक्के आदिवासी लोकसंख्या — ज्यामध्ये माडिया गोंड आणि कोलाम यांसारख्या विशेषतः दुर्बल आदिवासी जमाती (PVTGs) वास्तव्यास आहेत. अशा भौगोलिक आणि सामाजिक आव्हानांवर मात करत जिल्हा प्रशासनाने “ आदी कर्मयोगी – प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम” यशस्वीरित्या राबवला आणि लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण केला.
‘आदी कर्मयोगी’ अभियानाची ठोस पावले
या अभियानांतर्गत नागरिकांच्या थेट सहभागातून गावोगावी विकासाची नवी दिशा निश्चित करण्यात आली — ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करून प्रशासनाची सेवा तळागाळात पोहोचवली. ५५३ ग्रामसभांद्वारे ग्राम कृती आराखडे तयार करण्यात आले, ज्यातून शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि पायाभूत सुविधा यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आला. ५३,००० नागरिकांचे प्रभावी एकत्रीकरण करून लोकशाही सक्षमीकरणाला चालना दिली.
समुदाय वनहक्क सक्षमीकरणाचा आदर्श प्रयोग
सामुदायिक वन हक्क कायद्यांतर्गत ग्रामसभांना तब्बल ५.१२ लाख हेक्टर वनक्षेत्राचे व्यवस्थापन सोपविण्यात आले. याशिवाय, ४९७ ग्रामसभा मनरेगा अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदविण्यात आल्या. या सर्व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी १७ विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून एकात्मिक प्रशासनाचा नमुना उभा करण्यात आला — जो देशातील इतर दुर्गम जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देशपातळीवर गडचिरोलीचा गौरव!
राज्यातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड होणे हेच जिल्ह्याच्या कार्यक्षमतेचे मोठे प्रतीक ठरले आहे. श्री. अविश्यांत पंडा यांनी भारत सरकारसमोर “आदी कर्मयोगी मॉडेल”चे प्रभावी सादरीकरण करून या जिल्ह्याच्या यशोगाथेला राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवले.
गडचिरोली — दुर्गमतेतून आदर्शतेकडे!
या सन्मानामुळे गडचिरोली जिल्हा केवळ नकाशावरचा एक दुर्गम भाग न राहता, लोकाभिमुख आणि सशक्त प्रशासनाचे केंद्र म्हणून उदयास आला आहे हा पुरस्कार केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून गडचिरोलीतील प्रत्येक नागरिकाचा अभिमान आहे!








