शाश्वत विकासांतर्गत निश्चित कलेले लक्ष विहित वेळेत पूर्ण करणार डॉ. विपीन इटनकर
जिल्हा निर्देशांक आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर,दि. 26 : शाश्वत विकास ध्येय या कार्यक्रमामध्ये 17 शाश्वत व 169 लक्ष्ये निर्धारित करण्यात आले आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत नविन योजनांचा माध्यमातून शाश्वत विकासाचे ध्येय विहित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले असल्यामूळे जिल्ह्यासाठीचे ध्येय निश्चित पूर्ण करण्यात येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा सांख्याकी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यात शाश्वत विकास ध्येय प्रगतीमापन अहवाल तयार करण्यात आला असून या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा सांख्याकी विभागाचे उपसंचालक संजय पाठक, सांख्याकी अधिकारी माधुरी भांगे-नासरे उपस्थित होते.
शाश्वत विकास कार्यक्रम-2030 हा उपक्रम भारतासह 193 देशांनी स्विकारला आहे. यांतर्गत 17 शाश्वत विकास ध्येय व त्यांतर्गत असलेली 169 लक्ष्ये निर्धारित करण्यात आली आहे. शाश्वत विकासाचा अजेंडा हा सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटकांशी निगडीत आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या व नविन योजनांच्या अंमलबजावणीतून शाश्वत विकास ध्येय साध्य करावयाचे आहे. या योजनांची अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्याला प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
शासनाच्या संकेतस्थळ व डॅशबोर्डवर जिल्ह्यांची वर्षनिहाय प्रगती आणि रँकिंग उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या विभागाशी संबंधित अद्यावत अचूक सांख्याकी माहिती कालमर्यादेत उपलब्ध करून द्यावे असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. अर्थ व सांख्याकी संचालनालयाद्वारे जिल्ह्यातील निवडक भागात राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत कुटुंबाचा सामाजिक उपभोग-आरोग्य आणि देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण सुरू असून यासोबतच विविध विषयांवरील सर्वेक्षण घेतले जाणार आहे. ही माहिती निवडलेल्या कुटुंबांकडून घेतली जाणार असून जिल्हा पातळीवरील नियोजनाकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशांक आराखडा प्रगती मापन अहवालामध्ये सन 2015-16 ते 2022-23 पर्यंत नागपूर जिल्ह्यातील निर्देशांकनिहाय प्रगतीची आकडेवारी देण्यात आली आहे. या निर्देशांकाच्या अनुषंगाने जिल्ह्यात झालेल्या प्रगतीचे मोजमाप व सनियंत्रण करण्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे. अर्थ व सांख्याकी संचालनालयाचे आयुक्त डॉ. जोत्स्ना पडियार व संचालक कृष्णा फिरके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय आराखडा प्रगतीमापन अहवाल तयार करण्यात येत असल्याचे उपसंचालक संजय पाठक यांनी यावेळी सांगितले.








