मुलींची छेडछाड रोखण्यासाठी चिडीमार पथक स्थापन करा.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलूकरांची मागणी : पोलिस निरीक्षकांना निवेदन
सेलू: दि.26 शहर व परिसरात वाढत्या छेडछाडीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात तसेच चिडीमार पथक स्थापन करावे, अशी मागणी सेलूकरांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.जयसिंग शेळके, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, गणेश शेवाळे, लालू खान, आकाश इघवे, गोविंदा गायकवाड, एकनाथ जाधव आदींनी शुक्रवारी सेलू येथील पोलिस निरीक्षकांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, शहरातील शाळा, महाविद्यालये व अभ्यासिका परिसरात मुलींवर छेडछाडीच्या घटना वाढल्या असून, सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला व तरुणींना दर्शनासाठी व दांडियासाठी जाताना टवाळ खोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरात अल्पवयीन जोडप्यांचे प्रमाण वाढत असून, त्याचा लहान मुलांवर गैरपरिणाम होत आहे. यामुळे किरकोळ भांडणांचे प्रकार घडत असून भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.छेडछाड रोखण्यासाठी चिडीमार पथक स्थापन करावे, अल्पवयीन जोडप्यांवर कार्यवाही करावी तसेच सेलू बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.








