ओबीसी आरक्षणाच्या ताणातून मजुराने आत्महत्या
बीड प्रतिनिधी: संगीता इनकर
पेठबीड येथील राहणारा मजूर राहुल ज्ञानेश्वर पतंगे (वय ३५) याने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या ताणातून खंडोबा मंदिराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २४ सप्टेंबर) घडली.
मृतक राहुल पतंगे हा आर. के. ड्रेसेस, बार्शीनाका येथे मजुरी करून उपजीविका भागवत होता. मागील २०–२५ दिवसांपासून तो “मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे आता आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत, आपल्या समाजावर अन्याय झाला आहे” अशा तणावात होता, अशी माहिती त्यांची पत्नी वैशाली राहुल पतंगे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
२४ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच तो कामावर न जाता घरी होता. दुपारी घरातून बाहेर पडताना त्याने पत्नीकडून पन्नास रुपये घेतले. त्यानंतर त्याचा फोन बंद लागला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेजारी प्रकाश कानगावकर यांनी पत्नीला फोन करून “राहुलने खंडोबा मंदिराजवळील झाडाला गळफास घेतला” अशी माहिती दिली.
कुटुंबीयांनी धाव घेत बीड येथील सरकारी दवाखान्यात पोहोचल्यावर पोलिसांनी अँम्बुलन्समधून मृतदेह आणलेला दिसला.
पत्नीने दिलेल्या निवेदनानुसार, या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही व कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
राहुल पतंगे याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई व इतर नातेवाईकांचा परिवार आहे.








